घरक्रीडाIND vs ENG : भुवनेश्वर कुमारला कसोटी संघात संधी का नाही? अखेर...

IND vs ENG : भुवनेश्वर कुमारला कसोटी संघात संधी का नाही? अखेर कारण झाले स्पष्ट

Subscribe

इंग्लंडमध्ये भारतीय संघ एकूण सहा कसोटी सामने खेळणार आहे.

भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. त्यानंतर भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. इंग्लंडमध्ये भारतीय संघ एकूण सहा कसोटी सामने खेळणार आहे. या सामन्यांसाठी काही दिवसांपूर्वी २० सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाली. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला या संघात संधी मिळाली नाही. भुवनेश्वरने याआधी इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. असे असतानाही त्याला संघात स्थान न मिळाल्याचे काहींना आश्चर्य वाटले. परंतु, भुवनेश्वरने बराच काळ कसोटी सामना न खेळल्यामुळे त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड न झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

भुवनेश्वर फिट असल्याची खात्री नाही

भारताने इंग्लंड दौऱ्यासाठी सहा वेगवान गोलंदाजांची २० सदस्यीय कसोटी संघात निवड केली आहे. तसेच चार पैकी तीन ‘स्टॅन्ड बाय’ खेळाडू हे वेगवान गोलंदाज आहेत. यात भुवनेश्वरला स्थान न मिळाल्याने कसोटी क्रिकेटसाठी निवड समिती त्याचा विचार करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी आयपीएल स्पर्धेत भुवनेश्वरच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर तो कसोटी क्रिकेट किंवा प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही. याबाबत सूत्रांनी सांगितले, इंग्लंडच्या दीर्घ दौऱ्यात कसोटी सामने खेळण्याइतपत भुवनेश्वर फिट असल्याची निवडकर्त्यांना खात्री नाही. त्यामुळे त्याला कसोटी संघात स्थान देणे टाळले आहे.

- Advertisement -

युवा वेगवान गोलंदाजांची चांगली कामगिरी

भुवनेश्वरने २०१८ नंतर प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही. तर दुसरीकडे मागील काही काळात भारताच्या युवा वेगवान गोलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात यश आले आहे. मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर यांसारख्या वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियात मिळालेल्या संधीचे सोने केले. तसेच जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्याने आणखी एका वेगवान गोलंदाजाला संघात स्थान देणे निवड समितीला अवघड जात आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -