घरक्रीडाIND vs ENG : भारतीय संघाने गाळला घाम; विराट, रोहितची नेट्समध्ये जोरदार...

IND vs ENG : भारतीय संघाने गाळला घाम; विराट, रोहितची नेट्समध्ये जोरदार बॅटिंग

Subscribe

भारतीय संघ २० ते २२ जुलै या कालावधीत कौंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.

भारत आणि इंग्लंड या जागतिक क्रिकेटमधील बलाढ्य संघांमध्ये पुढील महिन्यापासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ४ ऑगस्टपासून नॉटिंगहॅम येथे खेळला जाईल. या मालिकेच्या तयारीला भारतीय संघाने सुरुवात केली असून डरहम येथे शनिवारी खेळाडूंनी घाम गाळला. कर्णधार विराट कोहली, प्रमुख सलामीवीर रोहित शर्मा, फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि लोकेश राहुल यांनी नेट्समध्ये फलंदाजी केली. इंग्लंडमध्ये चेंडू स्विंग आणि सिम होतो. त्यामुळे फलंदाजांसाठी खेळपट्टीवर टिकणे आणि धावा करणे हे मोठे आव्हान असते. या आव्हानावर मात करण्यासाठी भारतीय फलंदाज जोरदार सराव करत आहेत.

भारतीय गोलंदाजांचाही सराव

खेळाडू सराव करतानाचे फोटो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून शेअर केले. फलंदाजांप्रमाणे गोलंदाजांची नेट्समध्ये घाम गाळला. ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांसह ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनही नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसला. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघ २० ते २२ जुलै या कालावधीत कौंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.

- Advertisement -

पंत, साहा सराव सामन्याला मुकणार 

या सराव सामन्यात भारताचे यष्टीरक्षक रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा खेळू शकणार नाहीत. पंत आणि भारताचा थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच दयानंदच्या संपर्कात आलेल्या वृद्धिमान साहा, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि राखीव सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन यांना खबरदारी म्हणून क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे पंत आणि साहा सराव सामन्याला मुकणार असून त्यांच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळू शकेल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -