नागपूर : भारतीय संघाने इंग्लंडविरोधात टी 20 सिरीज जिंकल्यानंतर आता भारत आणि इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. अशामध्ये नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 4 विकेट्सनी विजय मिळवत चांगली सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने इंग्लंडला 248 धावांत रोखले होते. याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी सावध सुरुवात केली पण अखेर 47.4 षटकांमध्ये 249 धावांचे लक्ष्य पार करत 4 विकेट्सनी विजय मिळवला. यावेळी नव्यानेच उपकर्णधार झालेल्या शुभमन गिलने सर्वाधिक 96 चेंडूंमध्ये 87 धावा केल्या. तसेच, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनीदेखील अर्धशतक करत भारताला विजय मिळवून दिला. (IND vs ENG ODI Nagpur Team India won by 4 Wickets against England)
हेही वाचा : IND VS ENG : आक्रमक इंग्लंडला भारतीय गोलंदाजांनी रोखले, 250 धावांचा टप्पाही गाठला नाही
भारतीय संघ 249 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरला. तेव्हा संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. रोहित शर्मा हा 2 धावांवर तर यशस्वी जैस्वाल हा 15 धावांवर बाद झाला. दोघेही सलामीवीर लागोपाठ बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांनी चांगली भागीदारी करत 94 धावांची भागीदारी केली. अय्यरने या सामन्यात 30 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण करत 36 चेंडूमध्ये 59 धावा केल्या. अय्यर बाद झाल्यानंतरहे उपकर्णधार गिल एक बाजू संभाळून होता. यावेळी त्याने अक्षर पटेलच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. यावेळी अक्षर पटेलने 47 चेंडूंमध्ये 52 धावा केल्या.
उपकर्णधार शुभमन गिलला शतक करता आले नाही, पण त्याच्या 87 धावांच्या खेळीने भारतीय संघाचा विजय जवळपास निश्चित केला. यावेळी इंग्लंडकडून साकिब महमूद आणि आदिल रशीद या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. त्याच्याशिवाय जोफ्रा आर्चर आणि जेकब बेथेलने प्रत्येकी एक विकेट घेतली. यावेळी भारतीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, इंग्लंडच्या 248 धावांमध्ये कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक 52 धावा केल्या. तर, जेकब बेथलने 51 धावांची खेळी केली. यावेळी हर्षित राणा, रवींद्र जडेजाच्या प्रत्येकी 3 विकेट्स तर मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.