IND vs ENG: रोहित शर्मा म्हणतो, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचे आम्हीच विजेते!

rohit sharma

मँचेस्टरमध्ये संपलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना कोरोनामुळे रद्द करावा लागला. या मालिकेत भारत आधीच २-१ ने पुढे होता. हा सामना रद्द झाल्यानंतर मालिकेच्या अंतिम निकालाबाबत बराच वाद झाला. इंग्लंडने एक निवेदन जारी करून दावा केला की जर भारतीय संघाने कसोटी खेळण्यापासून माघार घेतली तर या सामन्याचा विजेता यजमान संघ असेल. मात्र, वाद वाढताच इंग्लंडने आपला दावा मागे घेतला. यानंतर निर्णय घेण्यात आला की आयसीसी, बीसीसीआय आणि ईसीबी एकत्रितपणे अंतिम निर्णय घेतील.

दरम्यान, दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीच्या निर्णया आधीच भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचे विजेते आम्हीच आहोत, असा दावा केला. पंत्रकार परिषदेत बोलताना रोहितने भारतीय संघ या कसोटी मालिकेचा खरा विजेता आहे, असे मला वाटते असे म्हटले. मात्र, अंतिम निकाल अद्याप आलेला नाही. याचा निर्णय बीसीसीआय, आयसीसी आणि ईसीबी घेतील. पण माझ्या दृष्टीने आम्ही मालिका जिंकली आहे. अंतिम कसोटीचे काय होईल हे मला अद्याप माहित नाही. आम्ही फक्त एकच कसोटी खेळू की मालिका फक्त ४ कसोटींच्या आधारे ठरवली जाईल? याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. पण मला वाटते की भारताने ही मालिका जिंकली आहे, असे रोहित म्हणाला.

भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफच्या इतर तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यावर भारताने इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये होणारी शेवटची कसोटी खेळण्यास नकार दिला. या कारणास्तव सामना रद्द करावा लागला.

३४ वर्षीय रोहित म्हणाला की इंग्लंड दौरा माझ्यासाठी खूप चांगला होता. मी याला सर्वोत्तम म्हणणार नाही. कारण कसोटी क्रिकेटमध्ये माझी सर्वोत्तम खेळी येणे बाकी आहे. पण या दौऱ्यात मी ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यावर मी आनंदी आहे. मला हा फॉर्म आणखी कायम राखायचा आहे आणि माझी कसोटी कारकीर्द अधिक यशस्वी करण्याचा प्रयत्न करायचा आहे, असे रोहित म्हणाला.

इंग्लंड दौऱ्यावर रोहितने शानदार फलंदाजी केली. त्याने ४ कसोटींमध्ये ५२ च्या सरासरीने ३६८ धावा केल्या. या दौऱ्यात त्याने १ शतक आणि दोन अर्धशतकेही केली. रोहितने चौथ्या कसोटीत शतक झळकावले. इंग्लंडमधील हे त्याचे पहिले शतक होते.