IND vs ENG Women : कसोटीबाबत मिताली राज म्हणते…पंचांच्या ‘त्या’ निर्णयाचा धक्का बसला!

इंग्लंडने या सामन्यात भारताला फॉलोऑन दिला होता.

indian women team
पंचांच्या ‘त्या’ निर्णयाचा धक्का बसला

भारत आणि इंग्लंड या महिला क्रिकेट संघांमध्ये मागील आठवड्यात कसोटी सामना पार पडला. या सामन्यामध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना आपला पहिला डाव ९ बाद ३९६ धावांवर घोषित केला होता. याचे उत्तर देताना भारताचा पहिला डाव २३१ धावांत आटोपला. त्यामुळे इंग्लंडने भारताला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. भारताची दुसऱ्या डावातही ८ बाद २४० अशी अवस्था होती. मात्र, स्नेह राणा (नाबाद ८०) आणि तानिया भाटिया (नाबाद ४४) कसोटीत पदार्पण करणाऱ्या खेळाडूंनी शतकी भागीदारी करत भारताला सावरले. राणाला शतक करण्याची संधी होती. परंतु, पंचांनी अखेरच्या दिवसाचा खेळ लवकर संपवल्याने तिचे शतक हुकले. परंतु, अंधुक प्रकाशामुळे पंचांनी खेळ लवकर संपवल्याचे भारताची कर्णधार मिताली राजला आश्चर्य वाटले होते.

सामना संपल्याचे आमच्या लक्षात आले

आम्हाला पुढे खेळत राहायचे होते. आम्ही प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधारालाही (हेथर नाईट) तसे सांगितले होते. परंतु, पंचांनी बेल्स काढण्याचा (दिवस संपवण्याचा) निर्णय घेतल्यावर मला धक्काच बसला. अंधुक प्रकाशामुळे दिवस संपवला असे पंचांनी सांगितल्याचे स्नेह राणा मला येऊन म्हणाली. या गोष्टीचे मला आश्चर्य वाटले होते. दोन्ही संघांच्या खेळाडू एकमेकांचे हात मिळवत होत्या. त्यामुळे सामना संपल्याचे आमच्या लक्षात आले, असे मिताली म्हणाली.

स्नेह, तानियाने भारताला सावरले

दुसऱ्या डावामध्ये भारताची सुरुवात चांगली झाली होती. शेफाली वर्मा (६३), दीप्ती शर्मा (५४) आणि पुनम राऊत (३९) यांना धावा करण्यात यश आले होते. परंतु, त्यानंतर भारताने झटपट विकेट गमावल्या. त्यामुळे २ बाद १७१ वरून भारताची ८ बाद २४० अशी अवस्था झाली. मात्र, स्नेह राणा (नाबाद ८०) आणि तानिया भाटिया (नाबाद ४४) यांनी भारताला सावरल्याने हा सामना अनिर्णित राहिला.