घरक्रीडापृथ्वी शॉवर अन्याय की इतरांना न्याय?

पृथ्वी शॉवर अन्याय की इतरांना न्याय?

Subscribe

आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी नुकतीच भारताच्या २० सदस्यीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि मयांक अगरवाल या तीन सलामीवीरांना संघात स्थान मिळाले आहे. तसेच चार स्टॅण्ड बाय खेळाडूंमध्ये सलामीवीर म्हणून अभिमन्यू ईश्वरनचाही समावेश आहे. परंतु, पृथ्वी शॉला मात्र सलग दुसऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. पृथ्वीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीनंतर संघातून बाहेर करण्यात आले होते. त्यानंतर त्याने आपल्या फलंदाजीच्या तंत्रात थोडा बदल करत विजय हजारे करंडक आणि आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. मात्र, त्यानंतरही त्याला कसोटी संघात स्थान देणे निवड समितीने टाळले आहे.

विराट कोहलीचा भारतीय संघ सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम कसोटी संघ मानला जातो. मागील काही काळात भारताने ऑस्ट्रेलियात सलग दोन वेळा कसोटी मालिका जिंकण्याचा, तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांविरुद्ध त्यांच्याच देशात कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे भारताला सलग पाचव्या वर्षी आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान राखण्यात यश आले. आता कोहलीच्या संघाला कसोटी क्रिकेटमधील आपले वर्चस्व सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी, तसेच त्यानंतर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा झाली.

मुंबईकर युवा सलामीवीर पृथ्वी शॉला या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले नाही. पृथ्वीने मागील वर्षीच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळला होता. अ‍ॅडलेड येथे झालेल्या या सामन्यात पृथ्वीला दोन डावांमध्ये मिळून केवळ चार धावा (० आणि ४) करता आल्या होत्या. त्यातच दोन्ही डावांमध्ये ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी त्याचा त्रिफळा उडवला होता. पृथ्वी दोन्ही डावांत ज्याप्रकारे बाद झाला, ते भारताचे महान सलामीवीर सुनील गावस्कर यांना अजिबातच आवडले नव्हते.

- Advertisement -

‘पृथ्वीच्या बॅट आणि पॅडमध्ये खूप फट होती. डावाच्या सुरुवातीला फलंदाजाने चेंडू हळुवार हाताने आणि उशिरा खेळायचा असतो. कसोटी सामन्यात घाई करून चालत नाही. सुरुवातीलाच मोठा फटका मारायला गेल्यास बॅट आणि पॅडमध्ये मोठी फट निर्माण होते. चेंडू उशिरा स्विंग झाल्यास फलंदाज त्रिफळाचित होऊ शकतो किंवा बॅटची कड लागून चेंडू स्लिपमध्ये जाऊ शकतो. पृथ्वीच्या बाबतीत हेच झाले,’ असे गावस्कर त्यावेळी म्हणाले होते. त्यांच्याप्रमाणेच अन्य क्रिकेट समीक्षकांनीही पृथ्वीवर टीका केली होती. त्याच्या या निराशाजनक कामगिरीमुळे त्याला उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी संघात स्थान मिळाले नाही.

या गोष्टीतून धडा घेत पृथ्वीने त्याच्या फलंदाजीच्या तंत्रात थोडा बदल केला. याचा फायदा त्याला विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत झाला. मुंबईकडून खेळताना त्याने या स्पर्धेच्या ८ सामन्यांत तब्बल १६५ च्या सरासरीने आणि १३८ च्या स्ट्राईक रेटने ८२७ धावा चोपून काढल्या. त्यामुळे विजय हजारे स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पृथ्वीने आपल्या नावे केला. पृथ्वीने आपला हा दमदार फॉर्म आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातही कायम राखला.

- Advertisement -

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करताना पृथ्वीने मागील मोसमात निराशाजनक खेळ केला होता. त्यामुळे त्याला काही सामन्यांसाठी संघातून वगळण्यात आले होते. यंदा मात्र पृथ्वीने आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी करताना ८ सामन्यांत १६६ च्या स्ट्राईक रेटने ३०८ धावा फटकावल्या. तसेच त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज शिवम मावीने टाकलेल्या डावाच्या पहिल्याच षटकात सहा चौकार मारण्याची विक्रमी कामगिरीही केली.

विजय हजारे करंडक आणि आयपीएल स्पर्धेत पृथ्वीने केलेली दमदार कामगिरी मात्र कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी पुरेशी नव्हती. इंग्लंड दौऱ्यासाठी भारताने २० सदस्यीय संघाची घोषणा केली. तसेच चार स्टॅण्ड बाय खेळाडूंचीही निवड करण्यात आली. या एकूण २४ खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अगरवाल आणि अभिमन्यू ईश्वरन या चार सलामीवीरांचा समावेश होता. परंतु, पृथ्वीला सलग दुसऱ्या कसोटी मालिकेसाठी संघाबाहेर ठेवण्यात आले. रोहित भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असून त्याच्या कसोटी संघातील स्थानाविषयी प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही. परंतु, गिल आणि मयांक यांची गोष्ट थोडी वेगळी आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्या कसोटीत पृथ्वीला अपयश आल्यामुळे उर्वरित तीन सामन्यांत गिलला सलामीला खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा चांगला उपयोग करत त्याने तीन सामन्यांच्या सहा डावांमध्ये २५९ धावा केल्या. त्यानंतर मात्र इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी मालिकेत त्याची कामगिरी खालावली. या मालिकेच्या चार सामन्यांत तो १९ च्या सरासरीने केवळ ११९ धावाच करू शकला. तसेच तो यंदाच्या आयपीएलमध्येही अपयशी ठरला. परंतु, असे असतानाही गिलची इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघात निवड झाली आहे.

तसेच मयांकलाही मागील काही कसोटी सामन्यांत चांगली कामगिरी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलिया मालिकेच्या तीन सामन्यांत त्याला केवळ ७८ धावा करता आल्या. रोहित पहिल्या दोन सामन्यांना मुकला होता. मात्र, त्यानंतर त्याचे अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात पुनरागमन झाल्यावर मयांक एका सामन्यासाठी संघातून वगळण्यात आले होते, तर एका कसोटीत त्याला मधल्या फळीत खेळावे लागले. तसेच त्यानंतर इंग्लंडविरुद्ध त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, त्यालाही इंग्लंड दौऱ्यासाठी आता भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

गिल आणि मयांक यांनी मागील काही काळात केलेल्या कामगिरीच्या तुलनेत पृथ्वीची कामगिरी उजवी ठरते. तसेच पृथ्वीने आता त्याच्या फलंदाजीच्या तंत्रातही थोडा बदल केला असून त्यामुळे त्याला धावा करण्यात यश येत आहे. त्यातच त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत आणि खेळपट्टीवर सुरुवातीपासूनच आक्रमक शैलीत फलंदाजी करत गोलंदाजांवर दबाव टाकण्याची क्षमता आहे. त्याने याआधी भारत ‘अ’ संघाकडून इंग्लंडमध्ये चांगला खेळ केला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता, भारताच्या निवड समितीने आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी संघनिवड करताना इतर सलामीवीरांना न्याय देण्याच्या प्रयत्नात पृथ्वीवर अन्याय केला नाही ना? असा नक्कीच प्रश्न पडतो.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -