IND vs NZ 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंडदरम्यान अहमदाबादमध्ये आज निर्णायक लढत

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील टी-20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना (IND vs NZ 3rd T20) आज, बुधवारी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) हा सामना होईल. मालिकेतील पहिला सामना किवी संघाने जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने पलटवार करताना ६ विकेट्सने विजय मिळवला होता.

गेल्या चार वर्षांतील भारताची न्यूझीलंडसोबतची ही चौथी टी-20 मालिका आहे. भारताने मागील तीन मालिका एकही सामना न गमावता जिंकल्या आहेत. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. पाहुण्या संघाने पहिला सामना जिंकला असून हार्दिक पंड्याच्या संघाने लखनऊमध्ये 100 धावांचे लक्ष्य गाठून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. पण लखनऊच्या खेळपट्टीवर 100 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांच्या नाकीनऊ आले होते. त्यामुळे आता तिसरा सामना भारतीय संघाला ‘करा किंवा मरा’ अशा पद्धतीने खेळावा लागणार आहे.

रांची आणि लखनऊ येथे झालेल्या सामन्यांच्या निकालांपेक्षा येथील फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांची अधिक चर्चा झाली आहे. लखनऊच्या खेळपट्टीवरून बराच गदारोळ झाला. ज्याची किंमत इथल्या क्युरेटरला मोजावी लागेल. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने नवीन क्युरेटरची नियुक्ती आणि नवीन खेळपट्ट्या बांधण्याची घोषणा केली आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी टीम इंडियासमोर न्यूझीलंडकडून सलग चौथी टी-20 मालिका जिंकण्याचे आव्हान असेल. दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या T20 मध्ये 200हून अधिक धावा झाल्या होत्या. अशा स्थितीत मागील दोन सामन्यांच्या तुलनेत येथे फलंदाजांना पुन्हा एकदा धावा करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल यांसारख्या वरिष्ठ क्रिकेटपटूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या खेळाडूंना गेल्या दोन सामन्यांमध्ये फारसा प्रभाव दाखवता आलेला नाही. ईशान किशन, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी हे तिघेही धावा करू शकलेले नाहीत. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावल्यानंतर ईशानला अद्याप यश मिळालेले नाही. गिलला येथे आपल्या एकदिवसीय मालिकेतील सातत्य राखता आलेले नाही. त्याचबरोबर विराटच्या तिसर्‍या क्रमांकावर येणाऱ्या त्रिपाठीलाही कमाल दाखवता आली नाही. लखनऊमध्ये सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी बाजू सावरली नसती तर भारताला 100 धावांचे लक्ष्य गाठणे कठीण झाले असते. अशा परिस्थितीत पृथ्वी शॉचा टीम इंडियात समावेश होऊ शकतो.

भारतीय संघाला टी-20 सामन्यांत दीर्घकाळ विश्रांती
या सामन्यानंतर भारतीय संघाला जास्त काळ टी-20 सामन्यांत दीर्घकाळ विश्रांती मिळणार आहे. कारण, ऑस्ट्रेलियासोबत चार कसोटी सामन्यांची मालिका आहे, तसेच यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत भारतीय युवा ब्रिगेडला क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये आपली प्रतिभा दाखवण्याची ही सुवर्णसंधी मिळणार आहे.