नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये नुकतेच झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. तसेच, भारतीय संघ हा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया संघाशी भिडणार हे निश्चित झाले. पण या सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने एक खळबळजनक दावा केला आहे. तसेच, त्याने न्यूझीलंडच्या प्रथम क्षेत्ररक्षणाच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह सवाल उपस्थित केला आहे. आकाश चोप्रा म्हणाला की, “कदाचित न्यूझीलंडच्या मनात असा विचार आला असेल की त्यांना उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागू नये. तसेच, खेळपट्टी पाहिल्यानंतर प्रत्येक कर्णधाराने डोळे बंद करून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता,” असा दावा त्याने केला आहे. (IND vs NZ Aakash Chopra statement on New Zealand lose against Team India)
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील ग्रुप सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 249 धावा केल्या. त्यानंतर हे लक्ष्य पार करताना न्यूझीलंडचा संघ 205 धावांवर सर्वबाद झाला. तसेच, भारतीय संघाने हा सामना 44 धावांनी जिंकत ग्रुपमध्ये पहिले स्थान गाठले. तसेच, याचवेळी भारतीय संघ हा उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार हे निश्चित झाले. कदाचित याच भीतीमुळे न्यूझीलंडने हा सामना गांभीर्याने घेतला नाही का? याबद्दल आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, न्यूझीलंड संघाने या खेळपट्टीवर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला नाही याचे त्याला आश्चर्य वाटले.
समालोचक आकाश चोप्रा म्हणाला की, “पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय चुकीचा होता का? हा एक मोठा प्रश्न आहे. तुम्ही फलंदाजी करायला हवी होती. प्रामाणिकपणे सांगायचे तर, या खेळपट्टीवर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण कोण करते? पण तुम्ही ते केले. कदाचित तुम्हाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे नव्हते आणि लाहोरला जाऊन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचे होते. मला माहित नाही की, वास्तव काय आहे. जर तुम्ही नाणेफेक जिंकली तर तुम्ही या खेळपट्टीवर डोळे मिटून पहिले फलंदाजी कराल, कारण ती विकेट संथ होत जाते. त्यावर ना गवत होते ना दव पडते. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे चांगले फिरकीपटू असतील तर तुम्ही समोरच्या संघाला अडचणीत आणू शकता. जर भारताला 250-270 धावांचा पाठलाग करायचा असेल तर ते अडचणीत आले असते. कारण तुमच्याकडे चांगले फिरकीपटू होते.” 5 मार्च रोजी दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हा सामना लाहोरमध्ये खेळला जाणार आहे.