IND vs NZ : भारताला मालिका खिशात घालण्याची संधी; न्यूझीलंडसमोर मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान

पहिल्या टी-२० सामन्यात मिळालेल्या शानदार विजयानंतर भारतीय संघाला आज होणारा दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी असणार आहे

पहिल्या टी-२० सामन्यात मिळालेल्या शानदार विजयानंतर भारतीय संघाला आज होणारा दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी असणार आहे. तर न्यूझीलंडसमोर आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान असणार आहे. भारतीय संघ नव्या प्रशिक्षक आणि नव्या कर्णधाराच्या मार्गदर्शनात पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका खेळत आहे. तर न्यूझीलंडचा संघ यंदाच्या टी-२० विश्वचषकाचा उपविजेता संघ ठरला आहे. भारतीय संघ विश्वचषकात केलेल्या खराब कामगिरीला विसरून एका नव्या अध्यायाची सुरूवात करत आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान आज होणारा दुसरा टी-२० सामना रांचीच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजता सुरू होईल.

पहिल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना आपल्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडला २० षटकांत १६४ धावांवर रोखले होते. साहजिकच भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असणार आहे. पण प्रतिस्पर्धी संघात देखील कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल बदलणाऱ्या खेळाडूंची फौज आहे. भारताची सलामीवीर जोडी सध्या फॉर्ममध्ये आहे. पहिल्या सामन्यात रोहित आणि राहुलच्या जोडीने ५१ धावांची अर्धशतकीय भागीदारी करून संघाला विजयी करण्यात मोलाची भूमिका निभावली होती. तर सुर्यकुमारने मिळालेल्या जीवनदानाचा पुरेपुर फायदा घेत ४९ चेंडूत ५९ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला होता.

दरम्यान आज होणाऱ्या सामन्यात देखील भारतीय गोलंदाजांकडून संघाला मोठी अपेक्षा असणार आहे. कारण पहिल्या सामन्यातील विजयात गोलंदाजांचा महत्त्वाचा वाटा होता. पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमार आणि रवीचंद्रन अश्विनला प्रत्येकी २-२ बळी घेऊन न्यूझीलंडच्या फलंदाजांना चितपट केले होते. भारतीय संघाला आपल्या जुन्या आठवणी विसरून नवा कमबॅक करण्याची संधी असणार आहे. तर विश्वचषकातील उपविजेता न्यूझीलंड आपल्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. न्यूझीलंडचा संघ देखील नव्या कर्णधाराच्या मार्गदर्शनात खेळत आहे. आजच्या सामन्यात टिम साउदीच्या जागेवर ट्रेंन्ट बोल्ट किंवा मिचेल सँटनर कर्णधार असण्याची शक्यता आहे कारण न्यूझीलंडच्या संघ निवड समितीच्या माहितीनुसार कसोटी मालिका डोळ्यासमोर ठेवून न्यूझीलंडचा संघ प्रत्येक खेळाडूला पुरेसा आराम देण्यावर भर देत आहे.


हे ही वाचा: राहुल द्रविड भारताचे कोच आहेत हे धक्कादायक; रिकी पाँटिंग म्हणाला…