IND VS NZ : जुन्या आठवणींना विसरून नवी सुरूवात करणार भारतीय संघ; अशी असू शकते दोन्ही संघातील प्लेइंग XI

आज होणाऱ्या भारत विरूध्द न्यूझीलंडच्या पहिल्या टी-२० सामन्यात दोन्हीही संघातील खेळांडूवर सगळ्यांचीच नजर असणार आहे

टी-२० विश्वचषकातील खराब प्रदर्शनाला विसरून आजपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरूध्दच्या तीन टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाला चांगला कमबॅक करून चांगले प्रदर्शन करण्याची गरज आहे. नवीन प्रशिक्षक राहुल द्रविड आणि नवीन कर्णधार रोहित शर्मा यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघ एक नवीन सुरूवात करत आहे. अशातच पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ आतापासूनच तयारी करत आहे याची घोषणा प्रशिक्षक द्रविड यांनी केली आहे. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी केवळ ११ महिन्यांचा कालावधी राहिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. अशातच न्यूझीलंडविरूध्दच्या टी-२० सामन्यांसाठी विराट कोहली, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. सायंकाळी ७ वाजता जयपूर येथे पहिल्या टी २० सामन्याने या दौऱ्याची सुरूवात होईल.

भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी

यूएईत पार पडलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात चमकदार कामगिरी केलेल्या युवा खेळाडूंना न्यूझीलंडविरूध्दच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिले आहे. ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर, आवेश खान, आणि हर्षल पटेल या युवा खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. तर विश्वचषकात भारतीय संघातून बाहेर असलेला फिरकीपटू युजवेंद्र चहलला देखील संघात जागा मिळाली आहे.

तर दुसरीकडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरूध्द फायनलमध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाला तयारीसाठी फक्त तीन दिवसांचा कालावधी मिळाला. कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी केन विलियमसन संघातून बाहेर पडला आहे. अशातच टिम साउदीला संघाचा नवा कर्णधार बनवले आहे. न्यूझीलंडकडे आक्रमक गोलंदाजीसह मार्टिन गुप्टिलसारखे कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल वळवण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत. तर टी-२० विश्वचषकादरम्यान एकही सामना न खेळलेल्या काइल जेमिसन, मार्क चॅपमॅन आणि टॉड अॅस्टल यांचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे.

भारताचा आजचा संभावीत संघ

रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल (उपकर्णधार), ईशान किशन, रिषभ पंत, सुर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल,

न्यूझीलंडचा आजचा संभावीत संघ

टिम साउदी (कर्णधार), टॉड अॅस्टल, ट्रेंन्ट बोल्ट, मार्क चॅपमॅन, मार्टिन गुप्टिल, काइल जेमिसन, अॅडम मिलने, डेरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, इश सोधी,


हे ही वाचा: आयसीसीकडून क्रिकेटच्या ८ टुर्नामेंटची घोषणा, दोन दशकांनंतर पाकिस्तानकडे यजमानपद