IND vs SA Series: भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर कोरोनाचे सावट; नव्या विषाणूने वाढवले टेंशन

आफ्रिकन देशांमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे

आफ्रिकन देशांमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेत ३० हून अधिक नवीन कोरोना रूग्ण आढळले आहेत. जी नव्या विषांणूने बाधित आहेत. या विषाणूला बी.1.1.529 असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील नियोजित मालिकेवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत पुढील महिन्यात आफ्रिकेचा दौरा करणार आहे. दरम्यान दोन्ही संघांमध्ये तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार टी-२० सामने होणार आहेत. १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दौऱ्याचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच सादर करण्यात आले होते.

१७ डिसेंबरपासून होणार मालिकेला सुरूवात

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ १७ डिसेंबर ते २६ जानेवारी दरम्यान जोहान्सबर्ग, सेंच्युरियन, पार्ल आणि केपटाऊन येथे सामने खेळणार आहे. मात्र कोरोनाचा नवा विषाणू समोर आल्यानंतर ही मालिका धोक्यात आली आहे. बी.१.१५२९ व्हेरियंट डेल्टा आणि डेल्टा प्लसपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे म्हटले आहे. अनेक आरोग्य संरक्षण संस्थांनी असेही म्हटले आहे की या प्रकारासाठी अधिक चाचणी आणि सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे.

भारत अ संघ आफ्रिका दौऱ्यावर

सध्या दक्षिण आफ्रिकेत नवीन विषाणू आढळल्यामुळे कोरोना संसर्गाची रूग्ण देखील वाढली आहेत. अनेक देशांनी त्यांची विमानसेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. भारताने सध्या अशी कोणतीही माहिती जारी केलेली नाही. मात्र त्यावर पुढे निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान भारत अ संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे आणि दक्षिण आफ्रिका अ संघासोबत ब्लूमफॉन्टेन येथे तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.


हे ही वाचा: Kapil Dev : हार्दिक पांड्याला ऑलराउंडर म्हणता येईल का? दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी विचारला प्रश्न