IND vs SL : श्रीलंकन खेळाडू ‘कोरोना निगेटिव्ह’; सरावाला सुरुवात करण्याची परवानगी

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाची चिंता थोडी कमी झाली आहे.

sri lanka team
श्रीलंकन खेळाडू ‘कोरोना निगेटिव्ह’

कुसाल परेरा, धनंजय डी सिल्वा आणि दुष्मन्थ चमीरा या प्रमुख खेळाडूंसह श्रीलंकेच्या संपूर्ण क्रिकेट संघाचा आरटी-पीसीआर कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाची चिंता थोडी कमी झाली आहे. श्रीलंकन संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-२० मालिका काही दिवसांनी पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. एकदिवसीय मालिकेला आता १३ ऐवजी १८ जुलैला सुरुवात होणार आहे. श्रीलंकन खेळाडूंना आता या मालिकांसाठी सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आठवडाभर होते क्वारंटाईन

श्रीलंका क्रिकेटकडून (SLC) खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. यात सर्व खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. श्रीलंकन संघ इंग्लंड दौऱ्यावरून मागील आठवड्यात मायदेशी परतला. त्यानंतर संपूर्ण संघाला एक आठवडाभर क्वारंटाईन व्हावे लागले होते. परंतु, आता खेळाडूंचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बायो-बबलमध्ये दाखल होत सरावाला सुरुवात करण्याची परवानगी मिळाली आहे.

एकदिवसीय मालिका १८ जुलैपासून 

श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर आणि डेटा अ‍ॅनालिस्ट जी. टी. निरोशन यांना, तसेच दुसऱ्या बायो-बबलमध्ये असणाऱ्या आणखी एका श्रीलंकन खेळाडूला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे आगामी भारत-श्रीलंका मालिका पाच दिवसांनी लांबणीवर पडली आहे. एकदिवसीय मालिकेचे सामने आता १८, २० आणि २३ जुलैला, तर टी-२० मालिकेचे सामने २५, २७ आणि २९ जुलैला खेळले जाणार आहेत. एकदिवसीय आणि टी-२० मालिकेचे सर्व सामने हे कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडतील.