IND vs SL : भारताचे लक्ष्य मालिका विजयाचे! दुसऱ्या वनडेत फलंदाजांवर नजर

भारताच्या युवा क्रिकेटपटूंना स्वतःला सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

ishan kishan

शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्याची विजयी सुरुवात करण्यात यश आले. रविवारी झालेला पहिला एकदिवसीय सामना भारताने जिंकला. आता भारताच्या युवा क्रिकेटपटूंना स्वतःला सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळणार असून भारताला मालिका विजयाची संधी आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना मंगळवारी खेळला जाणार आहे. भारतीय संघाचे या सामन्यातही बाजी मारत एकदिवसीय मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे लक्ष्य असेल. तसेच या सामन्यात भारताच्या नवख्या फलंदाजांच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असेल.

दमदार खेळ सुरु ठेवण्याचा प्रयत्न

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. कर्णधार धवनने एक बाजू लावून धरत नाबाद ८६ धावांची खेळी केली. परंतु, सामन्यानंतर धवनने स्वतःच्या कामगिरीपेक्षा त्याच्या साथीदारांच्या आक्रमक खेळींचे अधिक कौतुक केले. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताच्या युवा खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यात संधी मिळत असून पहिल्या एकदिवसीय सामन्यात पृथ्वी शॉ (२४ चेंडूत ४३), ईशान किशन (४२ चेंडूत ५९) आणि सूर्यकुमार यादव (२० चेंडूत नाबाद ३१) या खेळाडूंनी संधीचे सोने केले. आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही दमदार खेळ सुरु ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

हार्दिकच्या गोलंदाजीकडे लक्ष 

गोलंदाजीत युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकी जोडगोळीने बऱ्याच काळानंतर एकत्र खेळताना २-२ विकेट घेत श्रीलंकन फलंदाजांना अडचणीत टाकले. तसेच भारतासाठी आणखी एक आनंदाची बाब म्हणजे हार्दिक पांड्या पुन्हा गोलंदाजी करताना दिसला. त्याने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५ षटकांत ३४ धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो कशी गोलंदाजी करतो आणि किती षटके टाकतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

सामन्याची वेळ : दुपारी ३ पासून; थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क