घरक्रीडाIND vs SL : द्रविडकडून नव्या गोष्टी शिकण्यास उत्सुक; टीम इंडियात निवड...

IND vs SL : द्रविडकडून नव्या गोष्टी शिकण्यास उत्सुक; टीम इंडियात निवड झाल्याचा ऋतुराजला आनंद

Subscribe

महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे.

भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचे बरेच प्रमुख खेळाडू आगामी काळात इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळणार आहेत. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचाही यात समावेश आहे. आयपीएल आणि भारत ‘अ’ संघाकडून केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे ऋतुराजची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे. या गोष्टीचा त्याला आनंद असून पुन्हा राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात खेळण्यासाठी तो उत्सुक आहे. द्रविड श्रीलंका दौऱ्यात भारताचे प्रशिक्षकपद भूषवेल.

भारताला सामना जिंकवून देण्याचा प्रयत्न

श्रीलंका दौऱ्यात फारसे सामने होणार नाहीत. त्यामुळे मला नव्या गोष्टी शिकण्याची मर्यादितच संधी मिळेल. परंतु, भारतीय संघात बरेच अनुभवी खेळाडू असून मला राहुल (द्रविड) सरांना पुन्हा भेटता येईल. मी याआधी त्यांच्या मार्गदर्शनात भारत ‘अ’ संघाकडून खेळलो आहे. परंतु, भारत ‘अ’ संघाचा अखेरचा दौरा एक-दीड वर्षांपूर्वी झाला होता. त्यामुळे बऱ्याच काळानंतर मला राहुल सरांसोबत क्रिकेटबाबत चर्चा करण्याची संधी मिळेल. मी त्यांच्याकडून नव्या गोष्टी शिकण्यास उत्सुक आहे. मला सामना खेळण्याची संधी मिळाली, तर मी सर्वोत्तम कामगिरी करून भारताला सामना जिंकवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, असे ऋतुराज म्हणाला.

- Advertisement -

परिस्थितीनुसार खेळ करणार 

ऋतुराजला आतापर्यंत ५९ स्थानिक एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असून त्याने ४७.८७ च्या सरासरीने २६८१ धावा केल्या आहेत. तसेच चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना त्याने आतापर्यंत १३ सामन्यांत पाच अर्धशतकांच्या मदतीने ४०० धावा केल्या आहेत. या कामगिरीमुळेच त्याची भारतीय संघात निवड झाली असून आंतरराष्ट्रीय पातळीवर परिस्थितीनुसार खेळ करण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -