घरक्रीडाIND vs WI 2nd ODI : भारताची मालिकेत बरोबरी; दुसऱ्या वनडेत विंडीजवर...

IND vs WI 2nd ODI : भारताची मालिकेत बरोबरी; दुसऱ्या वनडेत विंडीजवर १०७ धावांनी मात

Subscribe
रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या सलामीवीरांच्या झंझावाती शतकांमुळे भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर १०७ धावांनी मात केली. या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी केली आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजीत ५ बाद ३८७ अशी धावसंख्या उभारली. ही या मैदानातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. चायनामान कुलदीप यादवने या सामन्यात हॅटट्रिकची नोंद केली. ही त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरी हॅटट्रिक होती.
पहिल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यात विंडीजचा कर्णधार किरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर भारताचे सलामीवीर राहुल आणि रोहित यांनी डावाच्या सुरुवातीपासूनच विंडीज गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पहिल्या पॉवर-प्लेनंतर भारताची बिनबाद ५५ अशी धावसंख्या होती. राहुलने अवघ्या ४६ चेंडूत, तर रोहितने ६७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी २१ व्या षटकात भारताच्या १०० धावा फलकावर लावल्या. रोहितने डावखुरा फिरकीपटू खेरी पिएरच्या एकाच षटकात एक चौकार आणि एक षटकार लगावला. त्यानंतर जेसन होल्डर टाकत असलेल्या ३४ व्या षटकात एक धाव काढत रोहितने आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील २८ वे शतक होते. याच षटकात भारताच्या २०० धावाही पूर्ण झाल्या. पुढे अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर चौकार लगावत राहुलने १०२ चेंडूत आपले एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरे शतक झळकावले. मात्र, याच षटकात तो बाद झाला. त्याने १०४ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०२ धावांची खेळी केली. तसेच त्याने आणि रोहितने २२७ धावांची सलामी दिली. ही विंडीजविरुद्ध भारताच्या सलामीच्या जोडीची सर्वोच्च भागीदारी ठरली.
त्यानंतर पोलार्डने कर्णधार विराट कोहलीला खातेही उघडण्याची संधी दिली नाही. रोहितने मात्र आपली चांगली फलंदाजी सुरु ठेवत १३२ चेंडूत आपल्या दीडशे धावा पूर्ण केल्या. परंतु, पुढच्याच षटकात शेल्डन कॉट्रेलने त्याला बाद केले. रोहितने १३८ चेंडूत १७ चौकार आणि ५ षटकारांसह १५९ धावांची खेळी केली. यानंतर फलंदाजीला आलेल्या रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी अखेरच्या षटकांत चांगलीच फटकेबाजी केली. पंतने कॉट्रेलच्या एकाच षटकात २४, तर त्याने आणि अय्यरने चेसच्या एकाच षटकात ३१ धावा चोपून काढल्या. पंतने १६ चेंडूत ३ चौकार, ४ षटकारांसह ३९ धावा केल्यावर त्याला किमो पॉलने बाद केले. अय्यरने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत २८ चेंडूत आपले सलग चौथे अर्धशतक झळकावले. मात्र, ५३ धावांवर तो माघारी परतला. परंतु, त्यांच्या फटकेबाजीमुळे भारताने ५० षटकांत ५ बाद ३८७ अशी धावसंख्या उभारली.
याचा पाठलाग करताना विंडीजच्या डावाची चांगली सुरुवात झाली. सलामीवीर एविन लुईस आणि शाई होप यांनी ६१ धावांची सलामी दिली. मात्र, लुईस (३०), शिमरॉन हेटमायर (४) आणि चेस (४) झटपट बाद झाल्याने त्यांची ३ बाद ८६ अशी अवस्था झाली. यानंतर होपने निकोलस पूरनच्या साथीने विंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १०६ धावा जोडल्या. खासकरून पूरन आक्रमक फलंदाजी केली. अखेर त्याला मोहम्मद शमीने ७५ धावांवर माघारी पाठवत ही जोडी फोडली. त्याने या धावा ४७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने केल्या. तर कुलदीपने होपला ७८ धावांवर आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर किमो पॉल (४६) व्यतिरिक्त इतर फलंदाजांच्या निराशजनक कामगिरीमुळे विंडीजचा डाव २८० धावांवर आटोपला. भारताकडून शमी आणि कुलदीप यांनी प्रत्येकी ३ विकेट्स मिळवल्या
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -