नवी दिल्ली : मलेशियामध्ये खेळवल्या जात असलेल्या 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकाची स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचा 6 विकेट्सने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर आता दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडवर 9 विकेट्सने मोठा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. (India advances to final of U-19 Women T20 World Cup)
दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय घेतला होता. मात्र गट फेरीत अजेय राहिलेल्या भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध सुरुवातीपासूनच आक्रमक गोलंदाजी केली. त्यामुळे इंग्लंड पहिला धक्का जेमिमा स्पेन्स हिच्या रुपात बसला. जेमिमा फक्त 9 धावा करून बाद झाली. यानंतर दुसऱ्याच चेंडूवर ट्रुडी जॉन्सन खाते न उघडता बाद झाली. दोन विकेट पडल्यानंतर सलामीवीर डेव्हिना पेरिन आणि कर्णधार अबी नॉरग्रोव्ह यांच्यामध्ये तिसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागिदारी झाली. मात्र डेव्हिना पेरिनच्या रुपात इंग्लंडला तिसरा धक्का बसला. पेरिनने 40 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 45 धावा केल्या. यानंतर थोड्याच वेळात अबी नॉरग्रोव्ह बाद झाली. तिने 25 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 30 धावा केल्या.
𝗜𝗻𝘁𝗼 𝗧𝗵𝗲 𝗙𝗶𝗻𝗮𝗹! 👏 👏
The unbeaten run in the #U19WorldCup continues for #TeamIndia! 🙌 🙌
India march into the Final after beating England by 9⃣ wickets and will now take on South Africa in the summit clash! 👌 👌
Scorecard ▶️ https://t.co/rk4eoCA1B0 #INDvENG pic.twitter.com/n3uIoO1H1Q
— BCCI Women (@BCCIWomen) January 31, 2025
चार विकेट पडल्यानंतर इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे 20 षटकात इंग्लंडने 8 विकेट गमावत 113 धावा केल्या. भारताकडून पारुनिका सिसोदिया आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर आयुषी शुक्लाने दोन विकेट मिळाल्या. महत्त्वाचे म्हणजे इंग्लंडच्या सर्व आठही विकेट भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 5 षटके राखून सहज विजय मिळवला. सलामावीर गोंगाडी त्रिशा आणि जी. कमलिनीने पहिल्या विकेटसाठी 9 षटकांत 60 धावा जोडल्या. त्रिशाने 29 चेंडूत 5 चौकारांसह 35 धावा केल्या. त्याच वेळी, कमलिनीने 50 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 56 धावांची नाबाद खेळी केली. तर सानिका चालके 11 धावांवर नाबाद राहिली. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात अंतिम फेरीचा येत्या 2 फेब्रुवारी रोजी क्वालालंपूरच्या बायू मास ओव्हल मैदानावर पार पडणार आहे.
दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची भारताला संधी
दरम्यान, आयसीसी 19 वर्षाखालील महिला टी-20 विश्वचषका स्पर्धेचा दुसरा हंगाम सुरू आहे. पहिल्या हंगामात 2023 मध्ये भारतीय संघ विजेता बनला होता. त्यामुळे आता दुसऱ्या हंगामातही भारतीय महिला पुन्हा एकदा टी-20 विश्वचषकाच्या ट्रॉफीवर नाव कोरतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा – Virat Kohli : 12 वर्षांनी आला अन् 6 वर बाद झाला, पहिल्या रणजी सामन्यात कोहलीची कामगिरी