Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाChampions Trophy 2025 : भारत आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीत, यजमान पाकिस्तानसह बांग्लादेश स्पर्धेबाहेर

Champions Trophy 2025 : भारत आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीत, यजमान पाकिस्तानसह बांग्लादेश स्पर्धेबाहेर

Subscribe

रचिन रवींद्रचे शतक आणि कर्णधार टॉम लॅथमच्या अर्धशतकामुळे न्यूझीलंडने बांग्लादेशचा पाच विकेट्सनी पराभव केला. बांग्लादेशच्या या पराभवामुळे न्यूझीलंड आणि भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे यजमान पाकिस्तान आणि बांग्लादेश हे दोन्ही संघ स्पर्धेमधून बाहेर पडले आहेत.

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीत स्पर्धेत आज 6 वा सामना न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांच्यात खेळवण्यात आला. पाकिस्तानच्या रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात रचिन रवींद्रचे शतक आणि कर्णधार टॉम लॅथमच्या अर्धशतकामुळे न्यूझीलंडने बांग्लादेशचा पाच विकेट्सनी पराभव केला. बांग्लादेशच्या या पराभवामुळे न्यूझीलंड आणि भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे यजमान पाकिस्तान आणि बांग्लादेश हे दोन्ही संघ स्पर्धेमधून बाहेर पडले आहेत. (India and New Zealand in the semi-finals of the Champions Trophy while Pakistan and Bangladesh are out of the tournament)

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांग्लादेशची सुरुवात खराब झाली. बांग्लादेशने तन्झीद हसनच्या रुपात 45 धावांवर पहिली विकेट गमावली होती. मात्र त्यानंतर 118 धावांवर बांग्लादेशने आपल्या 5 विकेट गमावल्या. कर्णधार नजमुल हुसेन शांतोने 110 चेंडूत 9 चौकारांसह 77 धावांची खेळी केली. त्यांच्याशिवाय झाकीर अलीने 55 चेंडूंत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 45 धावा केल्या. परंतु  तन्जीद हसनने 24, रिशाद हुसेनने 26, मेहदी हसन मिराजने 13, तस्किन अहमद 10, तौहीद हृदयॉयने 7, महमुदुल्लाह 4 आणि मुशफिकुर रहीमने 2 धावा केल्या. त्यामुळे निर्धारीत 50 षटकांत बांग्लादेशने 9 बाद 236 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यश मिळवले. न्यूझीलंडकडून फिरकी गोलंदाज मायकेल ब्रेसवेलने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय विल्यम ओ’रोर्कने 2, तर मॅट हेन्री आणि काइल जेमिसन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा – Ind VS Pak : पाकिस्तान हरतोय पाहून चाहता भारताच्या बाजूने झाला, व्हिडीओ होतोय व्हायरल

बांग्लादेशकडून मिळालेल्या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचीही खराब सुरुवात झाली. अवघ्या 15 धावांवर न्यूझीलंड संघाने आपल्या 2 विकेट गमावल्या होत्या. यानंतर डेव्हॉन कॉनवे आणि या स्पर्धेत पहिलाच सामना खेळणाऱ्या रचिन रवींद्रने तिसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागिदारी केली. परंतु 45 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 30 धावा करून बाद झाला. यानंतर रचिन रविंद्रने कर्णधार टॉम लॅथमसोबत चौथ्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी केली. रचिन आणि लॅथम यांनी न्यूझीलंडला अडचणीतून बाहेर काढले आणि विजयाचा पाया रचला.

रचिनने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले. रचिनने 105 चेंडूत 12 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 112 धावा केल्या. त्याचवेळी, 76 चेंडूत 3 चौकारांसह 55 धावा काढून लॅथम बाद झाला. त्यानंतर विल यंग खाते न उघडताच बाद झाला. मात्र त्यानंतर ग्लेन फिलिप्स नाबाद 28 चेंडूत 21 धावा आणि मायकेल ब्रेसवेल नाबाद 11 धावा करून न्यूझीलंड संघाने उपांत्य फेरीत पोहचवले. बांगलादेशकडून तस्किन अहमद, नाहिद राणा, मुस्तफिजुर रहमान आणि रिशाद हुसेन यांनी प्रत्येकी एक विकेट मिळाली. बांग्लादेशच्या या पराभवामुळे आता यजमान पाकिस्तान संघही स्पर्धेबाहेर झाला आहे. तर दुसरीकडे भारताने स्पर्धेतील दोन सामने जिंकल्यामुळे तेही उपांत्य फेरीत पोहचले आहेत.

हेही वाचा – Javed Akhtar : विराट कोहली जिंदाबाद म्हटल्यावर जावेद अख्तर ट्रोल, युजरच्या कमेंटला जोरदार प्रत्युत्तर