भारत ब संघाला जेतेपद

अंतिम सामन्यात भारत क संघावर ५१ धावांनी मात, देवधर करंडक स्पर्धा

केदार जाधव आणि यशस्वी जैस्वाल यांनी केलेल्या अर्धशतकांमुळे भारत ब संघाने अंतिम सामन्यात भारत क संघावर ५१ धावांनी मात करत देवधर करंडक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. भारत क संघाला हा सामना जिंकण्यात अपयश आले असले तरी या संघाचा कर्णधार शुभमन गिलने अनोखा विक्रम केला. देवधर करंडकच्या अंतिम सामन्यात खेळणार्‍या संघाचे नेतृत्व करणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.

गिलला या सामन्यात नाणेफेक मात्र जिंकता आले नाही. भारत ब संघाचा कर्णधार पार्थिव पटेलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी निर्धारित ५० षटकांत ७ बाद २८३ अशी धावसंख्या उभारली. अनुभवी केदार जाधवने ९४ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८६ धावा केल्या. त्याला युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने ७९ चेंडूत ५४ धावांची खेळी करत उत्तम साथ दिली. अखेरच्या षटकांत विजय शंकर (३३ चेंडूत ४५) आणि कृष्णप्पा गौतम (१० चेंडूत ३५) यांनी फटकेबाजी केली. त्यामुळे भारत ब संघाने २८० धावांचा टप्पा पार केला. भारत क संघाकडून वेगवान गोलंदाज ईशान पोरेलने ४३ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट्स मिळवल्या.

२८४ धावांचा पाठलाग करताना मयांक अगरवालने भारत क संघाच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. त्याने ३१ चेंडूत २८ धावा केल्या. मात्र, त्याला शाहबाझ नदीमने बाद केले. पुढे भारत क संघाने झटपट विकेट गमावल्याने त्यांची ५ बाद ७७ अशी अवस्था होती. यानंतर प्रियम गर्ग (७४), अक्षर पटेल (३८), जलज सक्सेना (नाबाद ३७) आणि मयांक मार्कंडे (२७) यांनी चांगली फलंदाजी केली. मात्र, भारत ’ब’च्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत भारत क संघाला ५० षटकांत ९ बाद २३२ धावांवर रोखले.

संक्षिप्त धावफलक – भारत ब : ५० षटकांत ७ बाद २८३ (केदार जाधव ८६, यशस्वी जैस्वाल ५४, विजय शंकर ४५; ईशान पोरेल ५/४३) विजयी वि. भारत क : ५० षटकांत ९ बाद २३२ (प्रियम गर्ग ७४, अक्षर पटेल ३८, जलज सक्सेना नाबाद ३७; शाहबाझ नदीम ४/३२).