Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs ENG : टीम इंडियाचे विजयी कमबॅक; दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा उडवला ३१७...

IND vs ENG : टीम इंडियाचे विजयी कमबॅक; दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा उडवला ३१७ धावांची धुव्वा 

भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.

Related Story

- Advertisement -

पहिला कसोटी सामना दोनशेहून अधिक धावांनी गमावणाऱ्या भारताने दुसऱ्या कसोटीत विजयी कमबॅक केले. चेपॉक येथे झालेल्या दुसरा कसोटीत भारताने इंग्लंडचा ३१७ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. भारताने हा सामना जिंकण्यासाठी ४८२ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव १६४ धावांत आटोपला. त्यामुळे भारताने हा सामना ३१७ धावांनी जिंकला. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध हा धावांच्या बाबतीत भारताचा सर्वात मोठा विजय ठरला. याआधी भारताचा इंग्लंडविरुद्ध सर्वात मोठा विजय १९८६ मध्ये आला होता. लीड्समध्ये झालेला सामना भारताने २७९ धावांनी जिंकला होता.

लॉरेन्स, स्टोक्स झटपट बाद

फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारताने चौथ्या डावात इंग्लंडपुढे ४८२ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडची ३ बाद ५३ अशी अवस्था होती. चौथ्या दिवशी सुरुवातीलाच अश्विनने डॅन लॉरेन्स (२६) आणि बेन स्टोक्स (८) यांना झटपट बाद केले. तर डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने ऑली पोपला (१२) माघारी पाठवले. कर्णधार जो रूटने सावध फलंदाजी करत ९२ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. परंतु, अक्षरने त्याला अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद करत इंग्लंडला आणखी अडचणीत टाकले.

रोहित, अश्विनचे शतक

- Advertisement -

अक्षरनेच ऑली स्टोनला पायचीत पकडत डावात ५ विकेट पूर्ण केल्या. यानंतर मोईन अलीने फटकेबाजी करत ५ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने १८ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. अखेर त्याला कुलदीप यादवने माघारी पाठवत भारताचा विजय सुनिश्चित केला. त्याआधी रोहित शर्माच्या १६१ धावांमुळे भारताने पहिल्या डावात ३२९ धावांची मजल मारली आणि याचे उत्तर देताना इंग्लंडचा डाव १३४ धावांत आटोपला होता. अश्विनच्या शतकामुळे भारताने दुसऱ्या डावात २८६ धावा करत इंग्लंडला ४८२ धावांचे लक्ष्य दिले होते.


संक्षिप्त धावफलक – भारत : ३२९ आणि २८६ विजयी वि. इंग्लंड : १३४ आणि १६४ (मोईन अली ४३, जो रूट ३३; अक्षर पटेल ५/६०, अश्विन ३/५३).

- Advertisement -