शारजाह : एसीसी अंडर-19 आशिया चषक स्पर्धा सध्या दुबईत खेळवण्यात येत आहे. आज जपान संघासोबत सुरु असलेल्या सामन्यात भारताचा कर्णधार मोहम्मद अमानने दमदार शतक झळकावले. 122 धावा करून तो नाबाद राहिला. त्याच्या या अप्रतिम खेळीमुळे भारताने जपान संघाला 340 धावांचे आव्हान दिले. (India captain Mohammad Aman hits a powerful century against Japan in the ACC U19 Asia Cup)
शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात जपानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताकडून सलामीवीर म्हणून आलेल्या आयुष म्हात्रे आणि वैभव सुर्यवंशी यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 65 धावा जोडल्या. 13 वर्षीय वैभव पाकिस्तानविरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. मात्र जपानविरुद्ध त्याने 23 चेंडूंचा सामना करताना एक षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 23 धावा केल्या. संघाचा दुसरा सलामीवीर फलंदाज आयुष म्हात्रेने 24 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. याशिवाय केपी कार्तिकेयने 49 चेंडूत 57 धावांची दमदार खेळी केली. आंद्रे सिद्धार्थनेही संघासाठी 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
Mohammad Amaan Got Century #ACCMensU19AsiaCup pic.twitter.com/OyyCn64c7R
— Md Mahafuzur Rashid (@themahafuzhomeo) December 2, 2024
कर्णधार मोहम्मद अमनने संघासाठी सर्वोत्तम धावसंख्या उभारली. त्याने 122 धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान त्याने 118 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार मारले. हार्दिक राज याने देखील शेवटपर्यंत नाबाद राहत 12 चेंडूत 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद 25 धावांची खेळी खेळली. यासह भारताने निर्धारीत 50 षटकात 6 विकेट गमावत 339 धावांचा डोंगर उभा केला. विशेष म्हणजे अंडर-19 आशिया चषक स्पर्धेतील कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
हेही वाचा – WTC Final : अंतिम सामन्यासाठी भारतासमोर ही समीकरणे; 4 संघ शर्यतीत
कोण आहे मोहम्मद अमान?
दरम्यान, मोहम्मद अमान हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. 18 वर्षीय अमनची उत्तर प्रदेशातील ज्युनियर सर्किटमध्ये स्प्लॅश केल्यानंतर भारताच्या अंडर-19 संघासाठी निवड करण्यात आली होती. त्याचा क्रिकेट प्रवास प्रेरणादायी आहे. 2022 मध्ये त्याचे वडील आणि 2019 मध्ये कोविड-19 मुळे आई गमावल्यामुळे मोहम्मद अमान हा 16 व्या वर्षी अनाथ झाला. लहान वयातच आई-वडील गमावल्यानंतर त्याच्याकडे क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्याचा किंवा आपल्या भावंडांना उपाशी झोपू न देण्याचा पर्याय होता. त्याने क्रिकेटची निवड केली आणि आपले सर्वस्व या खेळाला दिले. अखेरीस भारताच्या अंडर-19 संघात त्याला स्थान मिळाले.