Ind vs New Zealand – भारत हरला..सामनाही आणि मालिकाही!

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या सीरीजमध्ये भारताचा ४ धावांनी पराभव झाला असून या विजयासह न्यूझीलंडने ३ सामन्यांची मालिका २-१ अशी खिशात घातली आहे.

Ind vs New Zealand T-20 Match
भारत विरूद्ध न्यूझीलंड टी-२० मॅच

एकदिवसीय मालिकेनंतर न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या टी-२० मालिकेमध्ये देखील विजय मिळवून इतिहास घडवण्याची संधी भारतीय संघाला मिळाली होती. मात्र, ही संधी भारताने दवडली असून न्यूझीलंडने ही ३ सामन्यांची टी-२० सीरीज २-१ अशा फरकाने जिंकली आहे. रविवारी झालेल्या तिसऱ्या मॅचमध्ये न्यूझीलंडने पाहुण्यांसमोर २१३ रन्सचं तगडं आव्हान ठेवलं होतं. मात्र, यजमानांनी उभारलेल्या धावांच्या डोंगरासमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकत शरणागती पत्करली. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये दिनेश कार्तिक आणि कृणाल पंड्या यांनी दिलेली झुंज देखील भारताला मॅच जिंकून देण्यात अपयशी ठरली.

इतिहास घडता घडता राहिला!

पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या धर्तीवर टी-२० सामन्यांची मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचे सर्व आडाखे हळूहळू न्यूझीलंडच्या फलंदाजांनी धुळीस मिळवले. न्यूझीलंडकडून कॉलिन मुन्रो (७२) आणि टीम सेइफर्ट (४३) या दोघांनी भारतीय बॉलर्सचा यथेच्छ समाचार घेतला. या दोघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने भारतासमोर २१३ रन्सचं लक्ष्य ठेवलं. या दोघांना केन विल्यम्सन(२७) आणि कॉलीन ग्रँडहोम(३०) यांनी मोलाची साथ दिली.

केली हाराकिरी आणि विकेट गिरी!

२१३ रन्सच्या टार्गेटचा तणाव भारतीय बॅट्समन्सवर पहिल्यापासूनच दिसत होता. स्कोअर बोर्डवर अवघ्या ६ धावा असताना शिखर धवनने तंबूचा रस्ता धरला. त्यानंतर रोहित शर्मा (३८) आणि विजय शंकर (४३) यांनी ७५ रन्सची भागीदारी करत भारतीय डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, शंकरला सँटनरने बाद केल्यानंतर रिषभ पंतने कर्णधार रोहित शर्माला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, २८ रन्सवर टिकनच्या बॉलिंगवर विल्यमसनने रिषभ पंतचा कॅच घेतला आणि मिडल ऑर्डवरचा तणाव स्पष्ट दिसू लागला.

भारतीय विकेट्सचा गडगडाट

१४१ ते १४५ या अवघ्या ६ धावांमध्ये रोहित शर्मा, हार्दिक पंड्या(२१) आणि महेंद्रसिंह धोनी (२) हे खंदे फलंदाज बाद झाल्यानंतर भारतीय डावाचा गडगडाट पुढे थांबलाच नाही. दिनेश कार्तिक(३३) आणि कृणाल पंड्या(२६) यांनी शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत अर्धशतकी भागीदारी केली खरी. पण ती भारताला २१३च्या लक्ष्याचा पाठलाग करताना पुरेशी ठरली नाही. २० ओव्हर्समध्ये भारतीय संघ ६ विकेट्सच्या मोबदल्यात २०८ धावांपर्यंतच पोहोचू शकला. न्यूझीलंडच्या कॉलिन मुन्रो आणि टीम सेइफर्ट या दोघांना अनुक्रमे मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरीज पुरस्काराने गौरवण्यात आलं.