किवी आव्हानासाठी सज्ज!

भारत-न्यूझीलंड पहिला टी-२० सामना आज

विराट कोहलीच्या भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौर्‍याला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. जागतिक क्रिकेटमध्ये या दोन बलाढ्य संघांत पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार असून या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी ऑकलंड येथे रंगणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होणार्‍या टी-२० विश्वचषकाला आता अवघे काहीच महिने शिल्लक आहेत. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील वातावरण, तसेच खेळपट्ट्यांमध्ये बरेचसे साम्य असल्याने भारताच्या या दौर्‍याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

भारतीय संघाने नव्या वर्षाची दमदार सुरुवात करताना श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांना मायदेशात मर्यादित षटकांच्या मालिकेत धूळ चारली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील अखेरचा एकदिवसीय सामना मागील रविवारी झाला. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी तयारी करण्याकरता भारताला फारसा वेळ मिळालेला नाही. भारतीय संघाचे मंगळवारी ऑकलंडमध्ये आगमन झाले आणि त्यांनी बुधवारी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुरुवारी त्यांनी नेट्समध्ये सराव केला. भारतीय संघाचे व्यग्र वेळापत्रक राखीव खेळाडूंसाठी मात्र फायदेशीर ठरू शकेल.

शिखर धवन, हार्दिक पांड्या, दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांना दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्ध खेळता येणार नाही. या मालिकेत पुन्हा एकदा भारताचा सलामीवीर लोकेश राहुलच्या कामगिरी सर्वांची नजर असेल. धवनच्या दुखापतीमुळे राहुलला सातत्याने सामने खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. तसेच रिषभ पंतच्या अनुपस्थितीत त्याने यष्टिरक्षणाचीही धुरा सांभाळताना सर्वांना प्रभावित केले. मात्र, आता पंतचे पुनरागमन झाल्याने न्यूझीलंडविरुद्ध या दोघांपैकी कोण यष्टिरक्षण करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

भारतीय संघ पहिल्या टी-२० सामन्यात दोन फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांचे संघातील स्थान पक्के मानले जात असून तिसर्‍या वेगवान गोलंदाजाच्या स्थानासाठी शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी यांच्यात स्पर्धा आहे. बुमराहने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान भारतीय संघात चार महिन्यांनंतर पुनरागमन केले. मात्र, त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्ध आपल्या कामगिरी सुधारणा करण्यास उत्सुक असेल.

भारताचे पारडे जड!
भारताने मागील वर्षी न्यूझीलंड दौर्‍यातील टी-२० मालिका १-२ अशी गमावली होती. मात्र, यंदाच्या मालिकेत विराट कोहलीच्या संघाचे पारडे जड मानले जात आहे. मागील महिन्यात ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत न्यूझीलंडला ३-० असा व्हाईटवॉश दिला. त्यामुळे कर्णधार केन विल्यमसनबाबत बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यातच ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन हे प्रमुख वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नाहीत. ही बाब भारताच्या पथ्यावर पडू शकेल.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), मनीष पांडे, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगलायन, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रँडहोम, डॅरेल मिचेल, मिचेल सँटनर, टीम सायफर्ट (यष्टीरक्षक), हमिश बॅनेट, ईश सोधी, टीम साऊथी, ब्लेअर टिकनर

सामन्याची वेळ : दुपारी १२.२० पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क