घरसंपादकीयओपेडडोपिंगमध्ये ‘उत्तेजन’ : जागतिक क्रमवारीत भारताचे लाजीरवाणे स्थान

डोपिंगमध्ये ‘उत्तेजन’ : जागतिक क्रमवारीत भारताचे लाजीरवाणे स्थान

Subscribe

आशियाई खेळानंतरची जगातली तिसरी सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा म्हणून जिच्याकडे पाहिले जाते, त्या राष्ट्रकुल स्पर्धेचा बिगुल वाजलाय. परंतुु, या स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला असून, अनेक खेळाडू पदकप्राप्तीपूर्वीच डोपिंगच्या जाळ्यात अडकल्याची दुर्दैवी घटना भारतीय क्रीडाक्षेत्राला चटका लावून गेली. मुळात डोपिंगमध्ये भारत जगात तिसर्‍या स्थानी असल्याने खरोखर खेळाडू डोपिंगमध्ये का अडकतात, याची कारणे पाहिल्यास काहींना पदक, विक्रमांची लालसा असते तर काहींना उत्तेजक द्रव्यांबाबत योग्य माहितीच नसते, तर काहींना जाणीवपूर्वक अडकवणे अशी महत्वाची कारणे समोर येतात. राष्ट्रकुल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या डोपिंग घटकाचा आढावा…

भारतीय क्रीडाविश्वाची प्रतिमा मलिन करण्यात महत्त्वाचे कारण समोर येते, ते म्हणजे डोपिंग. वाढते डोपिंगचे प्रकार खेळाडूंनाच नव्हे, तर खेळालाही मारक आहेत याचा विसर अनेकांना पडलेला दिसतो. सर्वात पहिला डोपिंगमधील दोषी खेळाडू १९७६ मध्ये ऑलिम्पिक गेम्समध्ये आढळला, यानंतर प्रत्येक वर्षी उत्तेजक द्रव्य घेणारे खेळाडू सातत्याने आढळत गेले.

- Advertisement -

बिजिंग ऑलिम्पिकमध्ये ‘से नो टू डोपिंग’ ही थीम हाती घेण्यात आली होती. मात्र, याच ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त डोपिंगचे प्रमाण आढळून आले. यात रशियाचे खेळाडू सर्वाधिक होते. सर्वाधिक डोपिंगचे प्रमाण हे वेटलिफ्टिंग, अ‍ॅथलेटिक्स, सायकलिंग आणि स्विमिंग या चार खेळात सर्वाधिक दिसून येते. जगभरात भारताचा डोपिंगमध्ये तिसरा क्रमांक लागतो, हे ऐकून धक्का बसेल.

गेल्या काही महिन्यांतील घडामोडी पाहिल्यास टोकिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा भाग असलेले दोन राष्ट्रीय खेळाडू आणि एक थ्रोअर डोपिंगमध्ये आढळ्याचे धक्कादायक सत्य समोर आलेय. हरियाणाचा कुस्तीपटू सतेंद्र मलिक हादेखील डोपिंग चाचणीत फेल झालाय. आता राष्ट्रकुलमधील पाच जणांना डोपिंगमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. यामागील कारणांचा विचार केल्यास फेडरेशनची बेपवाई, खेळाडूंप्रमाणेच प्रशिक्षकांची लालसा आणि आयएओकडून होणारी डोळेझाक अशी काही प्रमुख कारणे दिसून येतात. यामुळे जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेकडून सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार भारताने तब्बल दीडशेहून अधिक वेळा डोपिंगविरोधी पाऊल उचलल्याचे दिसते. संपूर्ण जगात भारत तिसर्‍या क्रमांकावर असल्याची दुर्दैवी बाब भारतीय क्रीडाप्रेमींसाठी लाजिरवाणी आहे.

- Advertisement -

28 जुलैपासून 8 ऑगस्ट दरम्यान इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होत आहेत. या महाकुंभात भारताचे 215 खेळाडू सहभागी झाले आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सर्वांच्या नजरा ज्याच्यावर खिळल्या आहेत, त्या नीरज चोप्राला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. अशा स्थितीत रिले संघातील एका खेळाडूसह कर्नाटकची ऐश्वर्या बाबू हीदेखील आता डोपिंग टेस्टमध्ये अडकल्याची धक्कादायक बाब समोर आली.

तिहेरी उडीत राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घालणारी ऐश्वर्या उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने आता पुन्हा एकदा स्पर्धेपूर्वीच भारताचे दोन प्रमुख खेळाडू माघारी आल्याने २१३ खेळाडू सहभागी होणार आहेत. यातही बॅडमिंटनमधील ‘फुलराणी’ म्हणून ओळखली जाणारी पी. व्ही. सिंधू हिला आता कोरोना तपासणी अहवालात संशयास्पद बाबी आढळल्याने विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामुळे भारताची चिंता वाढली आहे. ऐश्वर्यासह भारताचे एकूण पाच खेळाडू आतापर्यंत उत्तेजक चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. यात एस. धनलक्ष्मी (धावपटू), पॅरालिम्पिकमध्ये सहभाग नोंदवणारे अनीश कुमार (पॅरा थाळीफेकपटू) आणि गीता (पॅरा पॉवरलिफ्टिंगपटू) या खेळाडूंचाही सहभाग आहे. निश्चितच या बातमीचा भारताच्या राष्ट्रकुलमधील कामगिरीवर विपरित परिणाम जाणवेल.

नाडा अधिकार्‍यांनी घेतलेल्या नमुन्यांमध्ये गीता अ‍ॅनाबॉलिक स्टेरॉइडचे घटक आढळल्याने पॉझिटिव्ह आली तर कुमारच्या नमुन्यात लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आणि मास्किंग एजंट हायड्रोक्लोरोथियाझाईड आढळून आलाय. गीताचे तात्पुरते निलंबन करण्यात आले असून, राष्ट्रकुल संघातून काढून घेण्यात आले आहे. तर दुसरीकडे कुमारला राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळू शकते.

हायड्रोक्लोरोथियाझाईड हा वाडाच्या कोडअंतर्गत निर्दिष्ट पदार्थ त्याच्या नमुन्यांमध्ये आढळलाय. अशा पदार्थांसाठी तात्पुरते निलंबन अनिवार्य नाही. परंतु, पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया (पीसीआय)च्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कुमारच्या नमुन्यात आढळलेला हा पदार्थ त्याने रक्तदाबासाठी घेतलेल्या औषधामुळे आढळला आहे. कुमारने पाठवलेल्या नाडाच्या पत्रात म्हटले की, हा घटक त्यांच्या शरीरात कसा गेला, याचे ते स्पष्टीकरण देऊ शकतात. परिणामी, कुमारला तात्पुरते निलंबित करण्यात आले असल्याने पीसीआयला अपेक्षा आहे की, तो राष्ट्रकुलमध्ये आताही सहभागी होऊ शकतो. मात्र, गीता राष्ट्रकुलसाठी जाऊ शकत नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मारिया शारापोव्हानेदेखील दहा वर्षं एक औषध घेतले होते, ज्यामुळे ती डोपिंगमध्ये दोषी आढळली होती, नवीन नियमावलीत तिने घेतलेले औषध प्रतिबंधित करण्यात आले होते, मात्र तिला आणि तिच्या वैद्यकीय पथकाला याची कल्पना नव्हती, त्यामुळे तिच्याविषयी निर्णय बदलण्यात आला होता. भारतीय संघाविषयी बोलायचे झाले, तर धनलक्ष्मीच्या डोपिंग नमुन्यांमध्ये अ‍ॅनाबॉलिक स्टेरॉईड, तर ऑस्टारिन, सिलेक्टिव्ह एंड्रोजन रिसेप्टर मॉड्युलेटर (सार्म) नावाचे औषध आढळून आले आहे. चेन्नईतील राष्ट्रीय चॅम्पियनशिप दरम्यान 13 आणि 14 जून रोजी घेतलेल्या ऐश्वर्याच्या नमुन्यांमध्ये या बाबी आढळून आल्या आहेत. यामुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे.

मुळात, कॅनडास्थित जागतिक उत्तेजक विरोधी संस्था (वाडा)कडून प्रतिबंधित उत्तेजक पदार्थांची यादी प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यात जाहीर केली जाते. संस्था आपल्या संकेतस्थळावर ही यादी झळकवते. त्यानुसार खेळाडूंना उत्तेजक पदार्थ सेवन करणे टाळावे लागते. अन्यथा ते उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळतात. परंतु, एखादा खेळाडू त्यापूर्वीच्या वर्षी यादीत समावेश नसलेल्या एखाद्या प्रतिबंधित पदार्थाचे सेवन करत असला, मात्र त्यानंतर ‘वाडा’ने नवीन यादीत अशा पदार्थाचा उत्तेजक म्हणून समावेश केला असेल, तर खेळाडूने या पदार्थाबाबत आपली गरज आणि त्यासंदर्भातील माहिती जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेकडे द्यावी लागते. त्यानुसार मग संस्था त्या खेळाडूसंदर्भात निर्णय घेते.

उत्तेजक चाचणी कशाप्रकारे घेतली जाते, याचा अभ्यास केल्यास या चाचणीत खेळाडूच्या लघवी आणि रक्ताचे ‘अ’ आणि ‘ब’ असे दोन नमुने घेतले जातात. ते प्रयोगशाळेत तपासले जातात. त्यातून प्रतिबंधित पदार्थ सेवन केले की नाही, हे समजते. असे पदार्थ चाचणीत आढळले, तर संबंधित खेळाडूला बंदी घातली जाते. यासंदर्भातील नियमावली अत्यंत कडक आहे. त्यामुळे अशा चाचणीत दोषी आढळल्यास आजवर अनेकांना आपल्या करिअरला मुकावे लागल्याचीही उदाहरणे आहेत. उत्तेजक चाचणीत खेळाडू पहिल्यांदा दोषी आढळला तर चार वर्षांची बंदी त्याच्यावर घातली जाते. मात्र दुसर्‍यांदा खेळाडू दोषी आढळल्यास त्याच्यावर आठ ते दहा वर्षांची बंदी असते. खेळाडूंना आपल्या शिक्षेसाठी दाद मागता येते. परंतु, योग्य पुरावे देऊन तसे सिद्ध झाल्यास शिक्षा कमी होऊ शकते. जागतिक संस्थाच याबाबत न्यायनिवाडा करते. भारताचा कुस्तीगीर नरसिंह यादव याने अशा प्रकरणात आपली बाजू मांडून शिक्षा कमी करून घेतली होती. मात्र, बहुतांश खेळाडूंना आजवर दोषी मानण्यात आले असल्याचीच उदाहरणे आहेत.

याशिवाय ‘वाडा’प्रमाणेच प्रत्येक देशाची एक राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था म्हणजेच ‘नाडा’ ही संस्थाही कार्यरत असते. देशांतर्गत स्पर्धा आणि निवड चाचणीदरम्यान होणार्‍या चाचण्या ‘नाडा’मार्फतच केल्या जात असतात. या चाचण्यांचा निर्णय जागतिक संस्थेसाठी अधिकृत मानला जातो. कुठल्याही खेळातील खेळाडूने खासगीत एखाद्या प्रयोगशाळेत डोपिंग चाचणी केली तर ती नाडा आणि वाडा या दोघांनाही मान्य नसते.

उत्तेजक पदार्थ घेतल्याने कामगिरीत सुधारणा होते, असे म्हटले जाते. मात्र अशा सर्वच पदार्थांना मान्यता नसते. अगदी साधं उदाहरण म्हणजे, कॉफीचे सेवनही उत्तम कामगिरीसाठी सुचवलं जातं. कारण, कॉफीला प्रतिबंध घालण्यात आलेला नाही. मात्र, स्नायूंना बळकटी देणारे अनॅबॉलिक स्टेरॉईड, टेस्टॉस्टेरॉन आणि ड्रीनलिनसारख्या पदार्थांना मान्यता नाही. काही पेनकिलर्स तसेच अ‍ॅन्टिबायोटिक्स आणि त्वचेसाठीची काही मलम खेळाडू वापरू शकतात, त्याला ‘वाडा’कडून मान्यता आहे. परंतु, वास्तविक पाहता मोठ्या प्रमाणावर खेळाडूंना या सामान्य गोष्टींची माहिती नसते. परिणामी, ते कुणाच्या तरी सांगण्यावरून वा चुकीच्या व्यक्तींना फॉलो करून अनेकदा असे उत्तेजक परंतु प्रतिबंधित पदार्थ घेतात आणि उत्तेजक चाचणीत दोषी आढळतात. अनेक खेळाडू पैशांअभावी कुठल्याही कंपनीचे वा मिळेल ते प्रोटीन सप्लिमेंट घेतात. कुणाही विक्रेत्याकडून कमी पैशात मिळते म्हणून अनेकजण हे पदार्थ सेवन करतात.

अलिकडे काही माजी खेळाडू, प्रशिक्षक अनधिकृतरित्या औषधे वा प्रोटीन सप्लिमेंट खेळाडूंना विकत असल्याचे समोर आले आहे. मात्र, यातील काही घटक अत्यंत मारक असतात, ज्याचे सेवन चुकीचे ठरते. यामुळे खेळाडूंना उत्तेजक चाचणीत अडचणी येतात आणि त्यांच्या करिअरचाही प्रश्न उद्भवतो. अनेकांना धोकादायक कॅन्सरसह शारीरिक व्याधीही जडल्याची उदाहरणे आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे, अनेकदा डोपिंग प्रकरणांमध्ये बोलले जाते की, यासंदर्भात खेळाडूंना पुरेशी माहिती नसते. परंतु, खेळाडू ज्या संस्थेत वा अकॅडमीत घडतो, तेथेपासूनच त्याला डोपिंगविषयीची प्राथमिक माहिती आणि उत्तेजक पदार्थांची यादी याविषयी ज्ञान दिल्यास हे प्रकार आपसूकच कमी होतील. ‘वाडा’च्या संकेतस्थळावर उत्तेजक द्रव्यच नव्हे, तर त्यासंदर्भातील सर्वच नियमांची माहिती दिली जाते, ज्यात प्रत्येक देशांच्या संस्थांचीही संपूर्ण माहिती, नियम उल्लेखित केलेले असतात. कार्यपद्धती सांगितलेली असते. मुख्य म्हणजे, क्रीडा विभागाकडूनही काही कार्यशाळांमार्फत सातत्याने डोपिंगविषयी जागृती केली जाते. परंतु, खेळाडू त्याकडे फारसे गांभीर्याने पाहात नसल्याचीही शोकांतिका आहे.

भारतातील काही प्रशिक्षण यंत्रणा खेळाडूंना योग्य माहिती देण्यात अपुर्‍या पडतात, ही आजवरची ओरड असली तरी खेळाडूंनीही आपल्या करिअरच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अभ्यास म्हणून ही नियमावली तसेच डोपिंगसंदर्भातील माहिती सर्वप्रथम जाणून घ्यायला हवी, हे मात्र खरं. ‘वाडा’ आणि ‘नाडा’ या संस्था सातत्याने डोपिंग संदर्भात जनजागृतीसाठी ऑनलाईन, ऑफलाईन कार्यशाळाही घेतात. मात्र, असे असतानाही डोपिंगचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. याला आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्वत:हून उत्तेजक द्रव्य घेऊन कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न, हेदेखील समोर आले आहे. यात खेळाडूंसह प्रशिक्षकही तितकेच गुन्हेगार असल्याने हे चित्र बदलणे भारतीय क्रीडाविश्वासाठी अत्यंत गरजेचे बनले आहे. याचबरोबर जागितक संस्थेने नव्याने जाहीर केलेल्या प्रतिबंधित उत्तेजक द्रव्यांची माहिती, खास करून औषधांतील घटकांची माहिती प्रत्येक वर्षी अगदी तळागाळातील खेळाडूंपर्यंत पोहोचल्यास खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती होऊन काहीअंशी ते अशा प्रतिबंधित द्रव्याचे सेवन टाळतील. ज्यामुळे भारताची डोपिंगमधील जागतिक क्रमवारी निश्चितच खालावू शकते.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -