घरक्रीडाभारताचा नवा गोल्डन’ बॉय

भारताचा नवा गोल्डन’ बॉय

Subscribe

१८ व्या एशियाडचा थरार सध्या जकार्ता येथे सुरू आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. विशेषतः भारतीय नेमबाजांनी या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. यामध्ये १६ वर्षीय सौरव चौधरीचाही समावेश आहे. सौरभने १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. सौरभने अवघ्या ३ वर्षांपूर्वीच नेमबाजीचे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली आहे. इतक्या कमी काळात त्याने केलेली ही कामगिरी उल्लेखनीय आहे.

मेरठमधील कलिना या गावी ११ मे २००२ रोजी सौरभ चौधरीचा जन्म झाला. त्याचे वडील शेतकरी. घरची परिस्थिती तशी हलाखीची. त्यामुळे तो वडिलांसोबत शेतातच काम करायचा. शेतीच्या कामात तो रमायचा. परंतु, त्याला नेमबाजीचा छंद होता. तो त्याच्या गावात जत्रा लागली की तिथे जाऊन तो फुगे फोडायचा. त्यात तो हमखास बक्षीस जिंके. पुढे सौरभने आंतर शालेय नेमबाजी स्पर्धांतही भाग घेण्यास सुरूवात केली. हे पाहून त्याच्या वडिलांनी त्याला नेमबाजी प्रशिक्षणाला पाठवले.

सौरभने मेरठ जवळच्याच बाघपत येथील बाबा शामल नेमबाजी अकादमीमध्ये प्रवेश घेतला. तिथेच प्रशिक्षकांनी त्याचे गुण हेरले. अकादमीत त्याचे नेमबाजी तंत्र सुधारण्यास सुरूवात झाली. १४ वर्षांचा सौरभ हळूहळू राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवू लागला. त्यामुळे सौरभच्या वडिलांनी त्याला पूर्ण पाठींबा देण्याचे ठरवले. त्याच्यासाठी वडिलांनी १ लाख ७५ हजारांची बंदूक घेऊन दिली. सौरभनेही आपल्या कामगिरीत सातत्य आणले.

- Advertisement -

हळूहळू त्याने आंतरराष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धांतही चांगले प्रदर्शन करण्यास सुरूवात केली. डिसेंबर २०१७ मध्ये १०व्या आशियाई युथ ऑलिम्पिकच्या पात्रता स्पर्धेत सौरभने विक्रमी कामगिरी केली. या स्पर्धेत विश्वविक्रम करत सौरभने सुवर्ण पदक जिंकले. त्यामुळे २०१८ आशियाई युथ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरणारा सौरभ तिसरा भारतीय ठरला. २०१७ मध्येच झालेल्या कुमार सुरेंद्र सिंग अजिंक्यपद स्पर्धेत १५ वर्षाच्या सौरभने १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक पटकावले. पण ही त्याची कामगिरी विशेष होती. याचे कारण म्हणजे सौरभने एशियाड आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या जितू रायला मागे टाकत हे सुवर्ण पदक पटकावले.

२०१७ प्रमाणेच २०१८ वर्षातही सौरभने आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली. त्याने जर्मनीत झालेल्या २०१८ आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट्स फेडरेशन (आईएसएसएफ) ज्यूनियर विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. या स्पर्धेच्या पात्रता फेरीत त्याने चांगली कामगिरी केली. पण अंतिम फेरीत त्याने विश्वविक्रमी २४३.७ गुणांची कमाई करत हे सुवर्ण पदक पटकावले. या स्पर्धेनंतर चेक प्रजासत्ताक झालेल्या २८ व्या होप्स आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पुरूषांच्या ज्युनिअर गटामध्ये सौरभने सुवर्ण पदक पटकावले. त्यामुळे एशियाडमध्ये येण्यापूर्वी तो चांगल्या फॉर्मात होता. परंतु एशियाडमध्ये त्याच्यासमोर अनेक माजी विश्वविजेते असल्याने १६ वर्षांच्या सौरभकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा नव्हती. पण अवघ्या तीन वर्षांपूर्वी नेमबाजीची सुरूवात करणार्‍या सौरभने १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत अप्रतिम प्रदर्शन करत सुवर्ण पदक पटकावले. या स्पर्धेत त्याने त्याच्यापेक्षा २६ वर्षांनी मोठ्या जपानच्या टोमोयुकी मात्सुडाला मागे टाकले. त्याने एशियाडमध्ये केलेल्या सुवर्ण कामगिरीमुळे त्याच्याकडून २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा ठेवणे वावगे ठरणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -