घरक्रीडाभारताचा मालिका विजय

भारताचा मालिका विजय

Subscribe

शिखा पांडे, झुलन गोस्वामी यांनी मिळून घेतलेल्या ८ विकेट आणि स्मृती मानधनाच्या ६३ धावांच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड महिला संघाचा ७ विकेट राखून पराभव केला. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. भारताने या मालिकेतील पहिला सामना ६६ धावांनी जिंकला होता.

दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. शिखा पांडे आणि झुलन गोस्वामी यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. शिखाने एमी जोन्सला ३ धावांवर बाद केले, तर झुलनने साराह टेलर (१) आणि कर्णधार हेथर नाईट (२) यांना माघारी पाठवले. शिखाने संयमाने खेळणार्‍या टॅमी ब्यूमॉन्टला २० धावांवर दीप्ती शर्माकरवी झेलबाद केले. त्यामुळे इंग्लंडची ४ बाद ४४ अशी अवस्था झाली होती. यानंतर नॅटली स्किव्हर आणि लॉरेंस विनफिल्ड यांनी इंग्लंडचा डाव सावरला. त्यांनी १४ षटके फलंदाजी करत इंग्लंडच्या धावसंख्येत ४९ धावांची भर घातली. मात्र, लेगस्पिनर पूनम यादवने विनफिल्डला २८ धावांवर मानधनाकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. पुढे, जॉर्जिया एल्विस (०), कॅथरीन ब्रन्ट (०), अन्या श्रुसबोल (१) आणि सोफी एक्लेस्टोन (५) झटपट माघारी परतल्याने इंग्लंडची धावसंख्या ९ बाद ११९ अशी झाली होती. मात्र, स्किव्हरने अ‍ॅलेक्स हार्टलीला हाताशी घेत अखेरच्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. झुलनने स्किव्हरला पायचीत करत इंग्लंडचा डाव १६१ धावांवर संपुष्टात आणला. स्किव्हरने एकाकी झुंज देत १०९ चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८५ धावा केल्या.

- Advertisement -

१६२ धावांचा पाठलाग करताना भारताची सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्स खातेही न उघडता माघारी परतली. मात्र, स्मृती मानधना आणि पूनम राऊत यांनी दुसर्‍या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. स्मृतीने आक्रमकपणे तर राऊतने संयमाने फलंदाजी केली, पण जॉर्जिया एल्विसच्या गोलंदाजीवर साराह टेलरने राऊतला ३२ धावांवर अप्रतिमरीत्या यष्टिचित केले. मानधनाने मात्र दुसर्‍या बाजूला चांगली फलंदाजी सुरू ठेवत ५९ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे तिचे एकदिवसीय क्रिकेटमधील १५ वे अर्धशतक होते. अर्धशतकानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या नादात मानधना ६३ धावांवर बाद झाली. तिला श्रुसबोलने पायचीत केले. पुढे कर्णधार मिताली राज आणि दीप्ती शर्माने उर्वरित धावा करत भारताला विजय मिळवून दिला. मिताली ४७ धावांवर तर शर्मा ६ धावांवर नाबाद राहिली. ४ विकेट घेणार्‍या झुलन गोस्वामीला सामनाविराचा पुरस्कार मिळाला.

संक्षिप्त धावफलक –

- Advertisement -

इंग्लंड : ४३.३ षटकांत सर्व बाद १६१ (नॅटली स्किव्हर ८५, लॉरेंस विनफिल्ड २८; शिखा पांडे ४/१८, झुलन गोस्वामी ४/३०) पराभूत वि. भारत : ४१.१ षटकांत ३ बाद १६२ (स्मृती मानधना ६३, मिताली राज नाबाद ४७, पूनम राऊत ३२; अन्या श्रुसबोल २/२३).

संघाला विकेट मिळवून देणे माझे काम – झुलन गोस्वामी

इंग्लंडच्या ४ फलंदाजांना माघारी पाठवणार्‍या झुलन गोस्वामीला सामनाविराचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्यानंतर झुलन म्हणाली, डावाच्या सुरुवातीला संघाला विकेट मिळवून देणे हे माझे काम आहे. या सामन्यात मी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करू शकले याचा मला आनंद आहे. मी फक्त चांगली गोलंदाजी करून फलंदाजाला चूक करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत होते. खासकरून पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करणे सोपे नसते. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकावे लागतात. पण, मी गोलंदाजीचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -