नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका कांगारू संघाने 3-1 ने खिशात घातली. भारतीय संघाला दहा वर्षांनंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे पाकिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावली. याचा फटका आता भारतीय संघाला बसला आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाची घसरण झाली आहे. (India slips to third place in ICC Test rankings)
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावली तर दुसरीकडे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाने पाकिस्तानचा व्हाईटवॉश केला. सेंच्युरियनमधील पहिला सामना दोन विकेट राखून जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा 10 विकेट्सने पराभव केला. त्यामुळे आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत मोठे फेरबदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
भारताविरुद्ध 3-1 ने विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ आता 36 कसोटी सामन्यांमध्ये 4531 गुणांसह 126 रेटिंग मिळवून आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचला आहे. तसेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दोन वर्षात खेळलेल्या 17 कसोटींपैकी ऑस्ट्रेलिया संघाने 11 सामन्यात विजय आहे. तर 4 सामन्यात पराभव आणि 2 सामने अनिर्णीत राखण्यात संघाला यश आले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 63.73 इतकी आहे.
दक्षिण आफ्रिका डब्ल्यूटीसीत्या फायनलमध्ये
पाकिस्तानचा व्हाईटवॉश केल्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय संघाला मागे टाकत कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 30 कसोटी सामन्यांतून एकूण 3355 गुणांसह 112 रेटिंग मिळवून दुसरे स्थान पटकावले आहे. यासह दक्षिण आफ्रिका संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. महत्त्वाचे म्हणजे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका संघ 69.44 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे.
भारतीय संघाची क्रमवारीत घसरण
भारतीय संघाने सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध 3-0 आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1 ने कसोटी मालिका गमावली. याचा फटका भारतीय संघाला आयसीसी क्रमावारीत बसला आहे. भारतीय संघाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. भारतीय संघाने 39 सामन्यांतून 4248 गुणांसह 109 रेटिंग मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे. यानंतर इंग्लंड संघ 106 रेटिंगसह चौथ्या स्थानावर, न्यूझीलंड 96 रेटिंगसह पाचव्या स्थानावर, श्रीलंका 87 रेटिंगसह सहाव्या आणि पाकिस्तान 83 रेटिंगसह सातव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज 75 रेटिंगसह आठव्या, बांगलादेश 65 रेटिंगसह नवव्या आणि आयर्लंड 26 रेटिंगसह दहाव्या स्थानावर आहे.