घरक्रीडाIND vs AUS 1st test : गोलंदाजांमुळे भारताचे दमदार कमबॅक; पहिल्या डावात...

IND vs AUS 1st test : गोलंदाजांमुळे भारताचे दमदार कमबॅक; पहिल्या डावात आघाडी 

Subscribe

भारताला पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी मिळाली.

गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताला आघाडी मिळाली. अ‍ॅडलेड येथे सुरु असलेल्या डे-कसोटीत भारताच्या २४४ धावांचे उत्तर देताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे भारताला पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी मिळाली. भारताकडून ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने ४, उमेश यादवने ३ आणि जसप्रीत बुमराहने २ विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवसअखेर भारताची दुसऱ्या डावात १ बाद ९ अशी धावसंख्या होती. त्यांच्याकडे एकूण ६२ धावांची आघाडी होती.

दुखापतीमुळे अनुभवी सलामीवीर डेविड वॉर्नर या कसोटी सामन्याला मुकला. त्याच्या अनुपस्थितीत जो बर्न्सच्या साथीने मॅथ्यू वेडने ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनाही बुमराहने बाद करत ऑस्ट्रेलियाला दोन झटके दिले. भरवशाचा स्टिव्ह स्मिथही फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्याला अवघ्या एका धावेवर अश्विनने माघारी पाठवले. अश्विनने आपल्या फिरकीची जादू दाखवताना स्मिथपाठोपाठ ट्रेव्हिस हेड (७) आणि कसोटीत पदार्पण करणाऱ्या कॅमरुन ग्रीनला (११) बाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची ५ बाद ७९ अशी अवस्था झाली.

- Advertisement -

एका बाजूला विकेट जात असताना मार्नस लबूशेनने चांगली फलंदाजी सुरु ठेवली. त्याला दोन जीवदानही मिळाले. याचा उपयोग करत त्याने ४७ धावांची खेळी केली. अखेर त्याला उमेश यादवने पायचीत पकडले. उमेशनेच पॅट कमिन्सला भोपळाही फोडू दिला नाही. टीम पेनने कर्णधाराला साजेशी खेळी करत ९९ चेंडूत नाबाद ७३ धावा केल्या. मात्र, त्याला इतरांची फारशी साथ न लाभल्याने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांत आटोपला. त्याआधी दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपुष्टात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -