WTC Final : वृद्धिमान साहाबाबत चिंता; आणखी एक यष्टीरक्षक टीम इंडियासोबत इंग्लंडला जाणार

साहाच्या फिटनेस आणि आरोग्याबाबत निवड समितीला चिंता आहे.

ks bharat
भारताचा यष्टीरक्षक श्रीकर भरत 

भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना, तसेच इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्हीसाठी भारताने काही दिवसांपूर्वी २० सदस्यीय संघाची घोषणा केली होती. या संघात यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत आणि वृद्धिमान साहाचा समावेश आहे. परंतु, साहाच्या फिटनेस आणि आरोग्याबाबत चिंता असल्याने आता आंध्रचा यष्टीरक्षक-फलंदाज श्रीकर भरत भारतीय संघासोबत इंग्लंडला जाणार आहे. साहाला आयपीएल स्पर्धेदरम्यान कोरोनाची बाधा झाली होती. मंगळवारी तो कोरोनामुक्त झाला. मात्र, असे असले तरी निवड समिती कोणताही धोका पत्करण्यासाठी तयार नसून भरत राखीव यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघासोबत इंग्लंडला जाणार आहे.

निवड समितीला धोका पत्करायचा नाही

साहा कोरोनामुक्त झाला असला तरी त्याला पूणर्पणे तंदुरुस्त होण्यासाठी आणखी काही काळ लागू शकेल. त्यातच कसोटी क्रिकेटमध्ये विशेष यष्टीरक्षक असणे गरजेचे आहे. त्यामुळे श्रीकर भरत भारतीय संघासोबत इंग्लंडला जाणार आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये तीन महिने राहणार आहे. इतक्या दीर्घ दौऱ्यात साहा फिट नसल्यास आम्हाला दुसऱ्या यष्टिरक्षकाची गरज भासू शकेल. त्यामुळे निवड समितीला धोका पत्करायचा नाही, असे सूत्रांनी सांगितले.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक

भरत याआधीही कसोटी संघाचा भाग राहिलेला आहे. परंतु, त्याला अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळलेली नाही. २७ वर्षीय भरतने आतापर्यंत ७८ प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात ३७ च्या सरासरीने ४२८३ धावा केल्या आहेत. यात ९ शतके आणि २३ अर्धशतकांचा समावेश असून त्याच्या नावे एक त्रिशतक (३०८) आहे.