India vs Australia : शुभमन गिलने रचला इतिहास, भारताला अजून १९१ धावांची गरज

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने तिसऱ्या दिवसअखेर २८९ धावांवर ३ विकेट गमावल्या आहेत. भारत अजूनही १९१ धावांनी मागे आहे.

भारतीय संघाने दिवशी चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताची धावसंख्या ७४ पर्यंत पोहचवली. रोहित शर्मा ३५ धावांवर बाद झाल्यानंतर युवा शुभमन गिलने अनुभवी चेतेश्वर पुजारासोबत भारताचा डाव सावरला. यावेळी शुभमन गिलने कसोटीतील दुसरे शतक पूर्ण करताना भारताला मजबूत स्थितीत आणले. एका वर्षात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो चौथा भारतीय ठरला. त्याने २०२३ मध्ये एकदिवसीय सामन्यात द्विशतक, टी-२०मध्ये शतक आणि आज कसोटीत शतक झळकावले. यापूर्वी एका वर्षात रोहित शर्मा, सुरेश रैना व लोकेश राहुल यांनी हा पराक्रम केला होता. तसेच रोहित शर्माने आजच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैयक्तिक १७ हजार धावांचा टप्पा गाठला. असा पराक्रम करणारा रोहित सहावा भारतीय ठरला.

शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या विकेटसाठी २४८ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली. परंतु चेतेश्वर पुजारा ४२ धावांवर मर्फीला आपली विकेट देऊन गेला. पुजारा बाद झाल्यानंतर शुभमन गिलने विराट कोहलीसोबत ५८ धावांची भागिदारी केली. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला शुभमन गिल २३५ चेंडूंत १२ चौकार आणि १ षटकारांच्या मदतीने १२८ धावा करून बाद झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताच्या २८९ एवढ्या धावा झाल्या आहेत. विराट कोहली ५९ आणि रविंद्र जडेजा १६ धावा करून मैदानावर आहेत.

शुभमनचे ऐतिहासिक शतक
फॉर्ममध्ये नसलेल्या केएल राहुलच्या जागी युवा फलंदाज शुबमन गिलला बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात संधी देण्यात आली. शुभमन गिल तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात २१ आणि दुसऱ्या डावात ५ धावा अपयशी ठरला. परंतु त्याने चौथ्या सामन्यातील पहिल्या डावात खणखणीत शतक करत ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. तो एका वर्षात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा चौथा भारतीय ठरला. त्याने २०२३ मध्ये एकदिवसीय सामन्यात द्विशतक, टी-२०मध्ये शतक आणि आज कसोटीत शतक झळकावले. त्याने १९४ चेंडूंत कसोटीतील दुसरे शतक पूर्ण केले, अहमदाबाद येथे शतक झळकावणारा तो भारताचा पाचवा सलामीवीर ठरला.

स्टीव्ह स्मिथचे उत्तम क्षेत्ररक्षण
तिसऱ्या दिवसात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने तिसऱ्या दिवशी उत्तम क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा मैदानावर असताना १२-१३ षटके या जोडीला एकही चौकार खेचता आला नाही. यावेळी भारताने दीडच्या सरासरीने धावा केल्या. स्मिथने लावलेल्या अचूक क्षेत्ररक्षणामुळे भारताच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यास अपयश आले.