भारत-ऑस्ट्रेलिया मालिका अ‍ॅशेसइतकीच महत्त्वाची – स्टिव्ह वॉ

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये अनेक अविस्मरणीय कसोटी सामने व मालिका झाल्या आहेत.

स्टिव्ह वॉ

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये बॉर्डर-गावस्कर चषकासाठी कसोटी मालिका खेळली जाते. या दोन संघांमध्ये अनेक अविस्मरणीय कसोटी सामने आणि मालिका झाल्या आहेत. भारताने मागील वर्षी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. यंदाही या दोन संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार असून चाहते आणि खेळाडू यांच्यात या मालिकेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. याला कारण म्हणजे भारत-ऑस्ट्रेलिया मालिका अ‍ॅशेसइतकीच महत्त्वाची आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह वॉ याला वाटते.

‘तो’ आतापर्यंतचा सर्वोत्तम सामना

बॉर्डर-गावस्कर चषकासाठी होणारी मालिका ही अ‍ॅशेसइतकीच महत्त्वाची आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांतील द्वंद्व आता अधिक चुरशीचे होत चालले आहे. या दोन संघांत १९८६ मध्ये झालेला कसोटी सामना बरोबरीत संपला होता आणि मी पाहिलेला तो आतापर्यंतचा सर्वोत्तम सामना आहे. कोलकता कसोटीत (२००१) आम्हाला पराभव पत्करावा लागला होता, पण तो सामना सर्वांसाठीच खूप अविस्मरणीय होता, असे वॉ याने सांगितले.

म्हणून हे पुस्तक… 

भारतात क्रिकेट हा जणू धर्मच का मानला जातो याबाबतचे पुस्तक वॉ लवकरच प्रकाशित करणार आहे. त्याबाबत वॉ म्हणाला की, या पुस्तकामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया हे देश अधिक एकमेकांच्या जवळ येतील. भारतामध्ये विविधतेत एकता आहे आणि भारतीयांचे क्रिकेटवर खूप प्रेम आहे. या दोन गोष्टींचे मला नेहमीच खूप कुतूहल वाटते. मला असे पुस्तक काढायचे होते, ज्यात फोटोंच्या माध्यमातून लोकांना भारताबद्दल अधिक माहिती मिळेल. भारतात क्रिकेट हा धर्म का आहे, हे मी या पुस्तकातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.