घरक्रीडाInd vs Ban T20: पहिल्याच टी-२० सामन्यात बांगलादेशकडून भारताचा दणदणीत पराभव

Ind vs Ban T20: पहिल्याच टी-२० सामन्यात बांगलादेशकडून भारताचा दणदणीत पराभव

Subscribe

भारत आणि बांगलादेश दरम्यान दिल्लीत पहिला टी-२० सामना खेळवला गेला. या पहिल्याच सामन्यात भारताचा बांगलादेशकडून पराभव झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने सहा विकेट्स गमावत १४८ धावांचे आव्हान दिले होते. मात्र बांगलादेशने अवघ्या तीन विकेट गमावत तीन चेंडू शेष ठेवत १५४ धावा केल्या आहेत. अनुभवी फलंदाज मुशफिकूर रहीमने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशने पहिल्या टी-२० सामन्यात भारतावर ७ विकेट राखून मात केली. हा बांगलादेशचा टी-२० क्रिकेटमधील भारताविरुद्धचा पहिलाच विजय होता. तसेच हा सामना जिंकल्यामुळे त्यांनी ३ सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. शाकिब अल हसनच्या अनुपस्थितीत मुशफिकूरवर मोठी जबाबदारी होती आणि ही जबाबदारी चोख पार पाडत ४३ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ६० धावांची खेळी केली.

या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार मोहमदुल्लाहने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने पहिल्याच षटकात दोन चौकार लगावले. मात्र, या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शफीउल इस्लामने त्याला ९ धावांवर पायचीत पकडले. यानंतर फलंदाजीला आलेल्या लोकेश राहुल आणि शिखर धवनला धावांसाठी झुंजावे लागले.धावांची गती वाढवण्याच्या नादात राहुल १५ धावांवर माघारी परतला. त्याला फिरकीपटू अमिनुल इस्लामने बाद केले. श्रेयस अय्यरने काही चांगले फटके मारत १३ चेंडूत २२ धावांची खेळी केली. त्यालाही अमिनुलनेच बाद केले.

- Advertisement -

शिखरने एक बाजू लावून धरत धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच्यात आणि रिषभ पंतमध्ये ताळमेळाची गडबड झाली. ४१ धावांवर त्याला मोहमदुल्लाहने धावचीत केले. शिखरने या धावा ४२ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने केल्या. पंतला २६ चेंडूत केवळ २७ धावाच करता आल्या.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शिवम दुबेला केवळ एका धावेवर अफिफ हुसेनने बाद केले. परंतु, अखेरच्या षटकांमध्ये कृणाल पांड्या (८ चेंडूत १५ धावा) आणि वॉशिंग्टन सुंदर (५ चेंडूत १४ धावा) यांनी फटकेबाजी केली. त्यामुळे भारताने २० षटकांत ६ बाद १४८ अशी मजल मारली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -