घरक्रीडाIND vs ENG 3rd Test : पुजारा शतकाच्या नजीक; तिसऱ्या दिवसअखेर भारत...

IND vs ENG 3rd Test : पुजारा शतकाच्या नजीक; तिसऱ्या दिवसअखेर भारत २ बाद २१५

Subscribe

भारतीय संघ अजूनही १३९ धावांनी पिछाडीवर होता.

हेडिंग्ले येथे होत असलेल्या तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात कामगिरीत सुधारणा केली. पहिल्या डावात इंग्लंडला ३५४ धावांची मोठी आघाडी मिळाली. त्यामुळे भारतीय फलंदाजांवर दडपण होते. परंतु, हे दडपण योग्यपणे हाताळून भारतीय फलंदाजांनी तिसऱ्या दिवशी दमदार खेळ केला. चेतेश्वर पुजाराला मागील काही काळात चांगली कामगिरी करता येत नव्हती. परंतु, त्याला अखेर सूर गवसला. त्याने तब्बल १२ डावांनंतर अर्धशतक झळकावले. दिवसअखेर तो १८० चेंडूत १५ चौकारांसह ९१ धावांवर नाबाद होता. त्याला रोहित शर्मा (५९) आणि कर्णधार विराट कोहली (नाबाद ४५) यांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे तिसऱ्या दिवसअखेर भारताची २ बाद २१५ अशी धावसंख्या होती. भारतीय संघ अजूनही १३९ धावांनी पिछाडीवर होता.

राहुल आठ धावांवर बाद 

तिसऱ्या दिवशी इंग्लंडने ८ बाद ४२३ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. परंतु, त्यांचा डाव ४३२ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. पहिल्या डावात ३५४ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावाची चांगली सुरुवात केली. सलामीवीर लोकेश राहुलने सावध फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो आठ धावांवर असताना क्रेग ओव्हर्टनच्या गोलंदाजीवर चेंडू बॅटची कड घेऊन मागे गेला आणि स्लिपमध्ये उभ्या जॉनी बेअरस्टोने त्याला उत्कृष्ट एकहाती झेल पकडला.

- Advertisement -

पुजाराला रोहित आणि कोहलीची साथ

रोहितने मात्र दुसऱ्या बाजूने संयमाने फलंदाजी करत १५६ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. तसेच त्याने आणि पुजाराने दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचली. अखेर रोहितला ऑली रॉबिन्सनने पायचीत पकडत ही जोडी फोडली. यानंतर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. या दोघांना बाद करण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश आले नाही. दिवसअखेर पुजारा ९१ धावांवर, तर कोहली ४५ धावांवर नाबाद होता.


हेही वाचा – पुजाराचे १२ डावांनंतर अर्धशतक; आशियाबाहेर केली विक्रमी कामगिरी

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -