घरक्रीडाIND vs ENG 3rd Test : सलामीवीरांची दमदार अर्धशतके; पहिल्या दिवसअखेर इंग्लंडकडे...

IND vs ENG 3rd Test : सलामीवीरांची दमदार अर्धशतके; पहिल्या दिवसअखेर इंग्लंडकडे ४२ धावांची आघाडी

Subscribe

पहिल्या दिवसअखेर इंग्लंडची बिनबाद १२० अशी धावसंख्या होती.

वेगवान गोलंदाजांनंतर सलामीवीरांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडने गाजवला. हेडिंग्ले येथे आजपासून सुरु झालेल्या या कसोटीत भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांत आटोपला. याचे उत्तर देताना सलामीवीर हसीब हमीद आणि रोरी बर्न्स यांनी इंग्लंडच्या डावाची उत्कृष्ट सुरुवात करून दिली. या दोघांनी संयमाने फलंदाजी केली. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही. हमीदने १३० चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने नाबाद ६० धावांची, तर बर्न्सने १२५ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ५२ धावांची खेळी केली. त्यांच्या या दमदार कामगिरीमुळे पहिल्या दिवसअखेर इंग्लंडची बिनबाद १२० अशी धावसंख्या होती. त्यांच्याकडे पहिल्या डावात ४२ धावांची आघाडी होती.

अँडरसनने घेतल्या तीन विकेट

त्याआधी भारतीय संघ या मालिकेत १-० असा आघाडीवर असल्याने तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्याचे इंग्लंडसमोर आव्हान होते. त्यातच भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्याने इंग्लंडवर अधिकच दडपण येईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. परंतु, इंग्लंडच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. इंग्लंडचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पहिल्या तीन विकेट घेताना लोकेश राहुल (०), पुजारा (१) आणि कोहली (७) यांना झटपट बाद केले.

- Advertisement -

इंग्लंडविरुद्ध तिसरी सर्वात कमी धावसंख्या

सलामीवीर रोहित शर्मा (१९) आणि अजिंक्य रहाणे (१८) यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना फारसे यश आले नाही. या दोघांनी ३५ धावांची भागीदारी रचल्यावर रहाणेला (१८) रॉबिन्सनने माघारी पाठवले. यानंतर तळाच्या फलंदाजांना फारसे योगदान देता आले नाही. तर रोहितला १९ धावांवर ओव्हर्टनने बाद केले. त्यामुळे भारताचा पहिला ४०.४ षटकांत अवघ्या ७८ धावांत गारद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध ही भारताची तिसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली.


हेही वाचा – अँडरसनने तब्बल सातव्यांदा केली कोहलीची शिकार

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -