IND vs ENG 3rd Test : फलंदाजांकडून निराशा; भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांत गारद

भारताच्या एकाही फलंदाजाला २० धावांचा टप्पा पार करता आला नाही.

james anderson gets wicket of virat kohli
भारताच्या फलंदाजांकडून निराशा

फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका भारतीय संघाला बसला. हेडिंग्ले येथे होत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांत संपुष्टात आला. भारताच्या एकाही फलंदाजाला २० धावांचा टप्पा पार करता आला नाही. सलामीवीर रोहित शर्माने खेळपट्टीवर टिकण्याचा प्रयत्न केला. त्याने १०५ चेंडूत खेळून काढले. मात्र, त्याला केवळ १९ धावाच करता आला. त्याच्या व्यतिरिक्त केवळ अजिंक्य रहाणे (१८) दुहेरी धावसंख्या गाठू शकला. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी पहिल्या डावात भेदक मारा केला. जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हर्टन यांनी प्रत्येकी तीन, तर ऑली रॉबिन्सन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

अँडरसनने घेतल्या पहिल्या तीन विकेट 

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, भारताच्या फलंदाजांना कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवता आला नाही. जेम्स अँडरसनने लोकेश राहुल (०), पुजारा (१) आणि कोहली (७) यांना झटपट बाद केले. यानंतर रोहित आणि रहाणे यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, या दोघांनी ३५ धावांची भागीदारी रचल्यावर रहाणेला (१८) रॉबिन्सनने माघारी पाठवले. यानंतर तळाच्या फलंदाजांना फारसे योगदान देता आले नाही. तर रोहितला १९ धावांवर ओव्हर्टनने बाद केले. त्यामुळे भारताचा पहिला ४०.४ षटकांत अवघ्या ७८ धावांत गारद झाला.


हेही वाचा – लॉर्ड्स कसोटीत भारत-इंग्लंडच्या खेळाडूंमधील वाद मैदानाबाहेरही सुरु राहिला!