IND vs ENG 3rd Test : फलंदाजांची उडाली दाणादाण; तिसऱ्या कसोटीत टीम इंडिया डावाने पराभूत

चौथ्या दिवशी भारताने ६३ धावांतच आठ विकेट गमावल्या.

ollie robinson
ऑली रॉबिन्सनचा भेदक मारा; तिसऱ्या कसोटीत इंग्लंड विजयी  

तिसऱ्या दिवशी दमदार पुनरागमन केल्यानंतर चौथ्या दिवशी भारताच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. हेडिंग्ले येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारताचा दुसरा डाव २७८ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताने हा सामना एक डाव आणि ७६ धावांनी गमावला. इंग्लंडने या विजयासह पाच सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. या सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांत आटोपला होता. याचे उत्तर देताना इंग्लंडने ४३२ धावांची मजल मारत पहिल्या डावात त्रिशतकी आघाडी घेतली होती. यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चांगला खेळ केला होता. भारताची दिवसअखेर २ बाद २१५ अशी धावसंख्या होती. चौथ्या दिवशी मात्र भारताचा डाव गडगडला. पहिल्या सत्रात भारताने ६३ धावांतच आठ विकेट गमावल्या. इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सनने ६५ धावांत पाच विकेट घेतल्या.

रॉबिन्सनचा भेदक मारा

चौथ्या दिवशी भारताने २ बाद २१५ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. तिसऱ्या दिवसअखेर ९१ धावांवर नाबाद असलेला चेतेश्वर पुजारा चौथ्या दिवशी एकही धाव करू शकला नाही. त्याला रॉबिन्सनने पायचीत पकडले. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक झळकावले. परंतु, त्याला ५५ धावांवर रॉबिन्सननेच माघारी पाठवले. यानंतर रविंद्र जाडेजा (३०) आणि अजिंक्य रहाणे (१०) वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यामुळे भारताचा दुसरा डाव २७८ धावांत आटोपला. इंग्लंडने हा सामना एक डाव आणि ७६ धावांनी जिंकत मालिकेत बरोबरी केली. इंग्लंडकडून रॉबिन्सनने पाच, क्रेग ओव्हर्टनने तीन, तर जेम्स अँडरसन आणि मोईन अलीने प्रत्येकी एक विकेट घेतली.


हेही वाचा – ‘कोणाला तरी संघाबाहेर बसावे लागणारच’; अश्विनबाबत माजी क्रिकेटपटूचे विधान