Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs ENG : अहमदाबाद डे-नाईट कसोटी 'हाऊसफुल'; सौरव गांगुलीची माहिती 

IND vs ENG : अहमदाबाद डे-नाईट कसोटी ‘हाऊसफुल’; सौरव गांगुलीची माहिती 

तिसरा सामना २४ फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियममध्ये होणार आहे.

Related Story

- Advertisement -

विराट कोहलीच्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर ३१७ धावांनी विजय मिळवला. भारताने या मालिकेची निराशाजनक सुरुवात करताना पहिला सामना गमावला होता. परंतु, दुसऱ्या कसोटीत भारताने दमदार पुनरागमन केले. भारतीय संघाने दुसरा कसोटी सामना जिंकत चार सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. आता या मालिकेतील तिसरा सामना २४ फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना डे-नाईट (प्रकाशझोतात) होणार असून या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेल्याचे मंगळवारी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले.

५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश

‘अहमदाबाद येथे होणाऱ्या कसोटीची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. क्रिकेट पूर्वपदावर येत असल्याचा आनंद आहे,’ असे गांगुली म्हणाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, अहमदाबाद येथे होणाऱ्या अखेरच्या दोन्ही कसोटी सामन्यांसाठी आसनसंख्येच्या ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे. अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियम पुन्हा नव्याने बांधण्यात आले असून ते सध्याच्या घडीला जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियमची आसनसंख्या १ लाख १० हजार इतकी आहे.

आयपीएलबाबत निर्णय लवकरच

- Advertisement -

तसेच यंदाच्या आयपीएल स्पर्धेत प्रेक्षकांना प्रवेश देण्याबाबतचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार असल्याचे गांगुलीने सांगितले. हे वर्ष भारतातील क्रिकेटसाठी महत्वाचे आहे. आयपीएलमध्ये प्रेक्षकांना प्रवेश देता येईल का, हे आम्ही पाहत आहोत. आयपीएलमध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. मात्र, यंदाचे आयपीएल यशस्वीरित्या पार पडेल अशी आशा असल्याचे गांगुली म्हणाला.

- Advertisement -