घरक्रीडाIND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत त्याचा मला बाद करण्याचा प्रयत्न नव्हता;...

IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत त्याचा मला बाद करण्याचा प्रयत्न नव्हता; अँडरसनची बुमराहवर टीका

Subscribe

बुमराहने अँडरसनला बरेच उसळी घेणारे चेंडू टाकले होते.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. याची सुरुवात जसप्रीत बुमराह आणि जेम्स अँडरसन यांच्यातील वादाने झाली. लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बुमराहने फलंदाजी करणाऱ्या अँडरसनविरुद्ध चार नो-बॉलसह १० चेंडूंचे षटक टाकले. बुमराहने या षटकात बरेच उसळी घेणारे चेंडू टाकले. ही गोष्ट अँडरसनला अजिबातच आवडली नाही. तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर मोहम्मद शमीने अँडरसनला बाद केले. त्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परत जाताना त्याने बुमराहशी हुज्जत घातली. बुमराहचा त्यावेळी मला बाद करण्याचा नाही, तर घाबरवण्याचा प्रयत्न होता, असे संकेत अँडरसनने दिले आहेत.

बुमराहचा हेतू वेगळाच होता

अगदी खरे सांगायचे, तर त्यावेळी मला धक्का बसला होता. आमचे सर्व फलंदाज खेळपट्टी संथ असल्याचे सांगत होते. गोलंदाजांनी उसळी घेणारे चेंडू टाकले, तरी ते संथ गतीने येत होते. फलंदाजीला आल्यावर मी जो रूटसोबत चर्चा केली होती. बुमराह नेहमीइतक्या वेगाने गोलंदाजी करत नसल्याचे तो मला म्हणाला होता. परंतु, त्याने मला पहिलाच चेंडू अगदी वेगाने आणि हेल्मेटच्या दिशेने टाकला. तो मला बाद करण्याचा प्रयत्न करत नव्हता. त्याचा हेतू काही वेगळाच असल्याचे मला वाटले, जे मला कारकिर्दीत यापूर्वी कधीही वाटले नव्हते, असे अँडरसन म्हणाला.

- Advertisement -

केवळ दोन चेंडू स्टम्पच्या दिशेने

मी फलंदाजी करत असताना बुमराहने १०, ११ की १२ चेंडूंचे षटक टाकले. तो नो-बॉलपाठी नो-बॉल टाकत होता. त्याने केवळ दोन चेंडू स्टम्पच्या दिशेने टाकले असावेत. ते चेंडू मी सहजपणे खेळून काढले, असेही अँडरसनने सांगितले. अँडरसनविरुद्ध बुमराहने उसळी घेणारे चेंडू टाकल्याने पुढील दिवशी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी याची परतफेड केली. त्यांनी बुमराहच्या हेल्मेटला लक्ष्य करत बरेच उसळी घेणारे चेंडू टाकले. मात्र, याचा फायदा बुमराहलाच झाला. बुमराहला राग आला आणि याचा त्याच्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान म्हणाला होता.


हेही वाचा – WI vs PAK 2nd Test : शाहीन आफ्रिदीचा भेदक मारा; पाकला विजयाची संधी

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -