IND vs ENG : ‘दर्जा वाढलाय’! सचिनकडून रोहित शर्माचे कौतुक

रोहितने इंग्लंडमध्ये सलामीवीर म्हणून खेळताना अप्रतिम कामगिरी केली आहे.

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत दमदार कामगिरी केली आहे. भारताला पहिला सामना जिंकण्याची संधी होती, पण पाचव्या दिवशी सततच्या पावसामुळे हा सामना अनिर्णित राहिला. लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत मात्र भारताने विजय मिळवत पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या यशात सलामीवीर रोहित शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रोहितला यंदा पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये कसोटीत सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळत आहे. त्याने दोन कसोटीत मिळून एका अर्धशतकासह १५२ धावा केल्या आहेत. त्याच्या या कामगिरीचे भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कौतुक केले आहे. तसेच या मालिकेत रोहित पूलचा फटका मारून दोनदा बाद झाला असला, तरी या गोष्टीची सचिनला फार चिंता वाटत नाही.

परिस्थितीनुसार खेळण्याची क्षमता

रोहितने आता अधिक जबाबदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्याने या दौऱ्यात त्याची वेगळी बाजू दाखवली आहे. परिस्थिती आणि खेळपट्टीनुसार खेळात बदल करण्याची क्षमता असल्याचे रोहितने दाखवून दिले आहे. त्याला लोकेश राहुलची उत्तम साथ लाभली आहे. पूलचा फटका मारण्याबाबत बोलायचे तर, त्याने हा फटका मारून अनेकदा चेंडू सीमारेषेबाहेर पोहोचवला आहे. त्यामुळे मला चिंता वाटत नाही. पहिल्या दोन कसोटीत रोहितने बऱ्याच सकारात्मक गोष्टी केल्या आहेत, असे सचिन म्हणाला.

रोहितने चांगला बचाव केलाय

रोहितने चेंडू चांगल्याप्रकारे सोडला असून तितकाच चांगला बचावही केला आहे. रोहित हा उत्कृष्ट खेळाडू आहेच, पण इंग्लंडमधील त्याच्या मागील काही खेळींवर नजर टाकल्यास त्याचा दर्जा अधिक वाढल्याचे मी म्हणू शकतो, असे सचिनने सांगितले. तसेच लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यामुळे भारतीय फलंदाजांना आव्हानात्मक परिस्थितीत खेळावे लागले. परंतु, भारतीय सलामीवीरांनी केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीचेही सचिनने कौतुक केले.


हेही वाचा – एकाशी पंगा घ्याल, तर आम्ही सगळे उत्तर देऊ! राहुलची प्रतिस्पर्ध्यांना ताकीद