इंग्लंडचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर असून या दोन संघांमधील कसोटी मालिका सध्या सुरु आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये पार पडले. पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर भारताने दमदार पुनरागमन करत दुसऱ्या कसोटीत मोठा विजय मिळवला. त्यामुळे आता या मालिकेत १-१ अशी बरोबरी असून उर्वरित दोन सामने अहमदाबादमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या सरदार पटेल स्टेडियममध्ये होणार आहेत. कसोटी मालिका संपल्यावर या दोन संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. एकदिवसीय मालिकेचे तिन्ही सामने पुणे येथे होणार आहेत. मात्र, अखेरच्या एकदिवसीय सामन्यानंतर इंग्लंडचा संघ मुंबईहून मायदेशी परतणार आहे. त्यामुळे अखेरचा एकदिवसीय सामना मुंबईत घेण्याबाबत सध्या विचार सुरु असल्याचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे म्हणणे आहे.
अंतिम निर्णय अजून नाही
‘एकदिवसीय मालिकेतील एक सामना (२८ मार्चला अखेरचा सामना) मुंबई येथे हलवण्याबाबत चर्चा झाली आहे. हा सामना झाल्यावर इंग्लंडचा संघ मुंबईहून सुरक्षितरित्या इंग्लंडमध्ये परत जाऊ शकेल. मात्र, याबाबतचा अजून अंतिम निर्णय झालेला नाही,’ असे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून सांगण्यात आले. भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने सध्या पुण्याच्या गहुंजे येथील स्टेडियममध्ये होणार असून पहिला सामना २३ मार्च, दुसरा सामना २६ मार्च आणि तिसरा सामना २८ मार्चला होईल.