रॉस द बॉस!

 टेलरचे शतक; पहिल्या वनडेत किवींची भारतावर मात

अनुभवी फलंदाज रॉस टेलरच्या दमदार शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर ४ विकेट राखून मात केली. या विजयामुळे न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. हॅमिल्टनला झालेला हा सामना जिंकण्यासाठी भारताने न्यूझीलंडसमोर ३४८ धावांचे आव्हान ठेवले होते, जे त्यांनी ११ चेंडू राखून पूर्ण केले. न्यूझीलंडने भारताविरुद्ध धावांचा यशस्वीपणे पाठलाग करताना केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताच्या श्रेयस अय्यरने एकदिवसीय क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक झळकावताना १०७ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०३ धावांची खेळी केली.

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या सलामीवीरांनी आठव्या षटकातच भारताच्या ५० धावा फलकावर लावल्या. मात्र, याच षटकात पृथ्वीला (२०) कॉलिन डी ग्रँडहोमने, तर पुढील षटकात मयांकला (३२) टीम साऊथीने माघारी पाठवले. त्यामुळे भारताची २ बाद ५४ अशी अवस्था झाली. कर्णधार विराट कोहली आणि अय्यर यांनी तिसर्‍या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. या दोघांना काही जीवदानही मिळाले. याचा फायदा घेत कोहलीने ६१ चेंडूत, तर अय्यरने ६६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. परंतु, लेगस्पिनर ईश सोधीने कोहलीचा ५१ धावांवर त्रिफळा उडवत ही जोडी फोडली.

पुढे अय्यरला फॉर्मात असलेल्या लोकेश राहुलची उत्तम साथ लाभली. त्यांनी ३६ व्या षटकात भारताच्या २००, तर ४० व्या षटकात भारताच्या २५० धावा फलकावर लावल्या. मिचेल सँटनरने टाकलेल्या डावाच्या ४३ व्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर राहुलने आपले अर्धशतक आणि पाचव्या चेंडूवर अय्यरने आपले एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले. मात्र, यानंतर धावांची गती वाढवण्याच्या नादात तो बाद झाला. त्याने आणि राहुलने चौथ्या विकेटसाठी १३६ धावांची भर घातली. पुढे राहुल आणि केदार जाधव (नाबाद २६) यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी केल्याने भारताने ५० षटकांत ४ बाद ३४७ अशी धावसंख्या उभारली. राहुलने ६४ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ८८ धावा केल्या.

३४८ धावांचा पाठलाग करताना मार्टिन गप्टिल आणि हेन्री निकोल्स या न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केल्यावर गप्टिलला (३२) शार्दूल ठाकूरने बाद केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा टॉम ब्लंडेलही (९) झटपट माघारी परतला. तर निकोल्सला ७८ धावांवर कर्णधार कोहलीने अप्रतिमरीत्या धावचीत केले. त्यामुळे न्यूझीलंडची ३ बाद १७१ अशी अवस्था झाली. मात्र, टेलर आणि लेथम या अनुभवी जोडीने १३८ धावांची भागीदारी रचत न्यूझीलंडला विजयासमीप नेले. अखेर लेथमला ६९ धावांवर कुलदीपने मोहम्मद शमीकरवी झेलबाद केले. तर जिमी निशम (९) आणि डी ग्रँडहोम (१) हेसुद्धा फारकाळ खेळपट्टीवर टिकले नाहीत. मात्र, टेलरने ८१ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०७ धावांची खेळी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिली. टेलरचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील २० वे शतक होते.

संक्षिप्त धावफलक – भारत : ५० षटकांत ४ बाद ३४७ (अय्यर १०३, राहुल नाबाद ८८, कोहली ५१; साऊथी २/८५) पराभूत वि. न्यूझीलंड : ४८.१ षटकांत ६ बाद ३४८ (टेलर नाबाद १०९, निकोल्स ७८, लेथम ६९; कुलदीप २/८४).

१३ महिन्यांत पहिले शतक!

भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रॉस टेलरने नाबाद १०९ धावांची खेळी करत न्यूझीलंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध तिसरे, तर एकूण २१ वे शतक होते. तसेच हे त्याचे १३ महिन्यांतील पहिलेच एकदिवसीय शतक होते. त्याने आपले अखेरचे मागील वर्षी जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध केले. नेल्सन येथे झालेल्या सामन्यात त्याने १३७ धावा केल्या होत्या.