घरक्रीडा20-20 मालिका जिंकत भारतीय संघाची वर्ष २०२० ची सुरुवात

20-20 मालिका जिंकत भारतीय संघाची वर्ष २०२० ची सुरुवात

Subscribe

श्रीलंके विरोधातील टी-२० मालिका जिंकत भारतीय क्रिकेट संघाने वर्ष २०२० विजयी सुरुवात केली आहे. लोकेश राहुल आणि शिखर धवन या सलामीवीरांने केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ७८ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची ही मालिका २-० अशी खिशात टाकली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. पुण्यात झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजीत ६ बाद २०१ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव अवघ्या १२३ धावांत आटोपला. ही भारताची २०२० वर्षातील पहिलीच मालिका होती आणि त्यांना विजयी सुरुवात करण्यात यश आले.

या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर राहुल आणि धवन यांनी सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर दबाव टाकला. अँजेलो मॅथ्यूजने टाकलेल्या दुसऱ्या षटकात त्यांनी १३ धावा फटकावल्या. त्यांनी पुढेही आक्रमक शैलीत खेळ करत पाचव्या षटकात भारताच्या ५० धावा फलकावर लावल्या. धवनला मागील काही टी-२० सामन्यांत चांगला खेळ करता न आल्याने त्याचे संघातील स्थान धोक्यात असल्याची चर्चा सुरु आहे. या सामन्यात मात्र त्याने अप्रतिम फलंदाजी करत ३४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. परंतु, चायनामन फिरकीपटू लक्षन संदाकनच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या नादात तो बाद झाला. त्याने ३६ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावांची खेळी केली.

- Advertisement -

भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या संजू सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत झोकात सुरुवात केली. मात्र, दुसऱ्याच चेंडूवर वनिंदू हसरंगाने त्याला माघारी पाठवले. राहुलने ३४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, पण ५४ धावांवर त्याला संदाकनच्या गोलंदाजीवर कुसाल परेराने यष्टिचित केले. तर संदाकननेच श्रेयस अय्यरला ४ धावांवर बाद केले. मात्र, मनीष पांडे (१८ चेंडूत नाबाद ३१), कर्णधार कोहली (१७ चेंडूत २६) आणि शार्दूल ठाकूर (८ चेंडूत नाबाद २२) यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी केल्याने भारताने द्विशतकी मजल मारली.

२०२ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. त्यांची सहाव्याच षटकात ४ बाद २६ अशी अवस्था झाली. अनुभवी मॅथ्यूज आणि धनंजय डी सिल्वा या पाचव्या जोडीने ६८ धावांची भागीदारी रचत श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात मॅथ्यूज ३१ धावांवर माघारी परतला. डी सिल्वाने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत ३१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे टी-२० क्रिकेटमधील पहिलेच अर्धशतक ठरले. मात्र, त्याला इतरांची साथ लाभली नाही. अखेर नवदीप सैनीने डी सिल्वा (५७) आणि मलिंगा (०) यांना बाद करत श्रीलंकेचा डाव १२३ धावांवर संपुष्टात आणला. त्यांच्या तब्बल ९ फलंदाजांना एकेरी धावसंख्याच करता आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -