नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. आज (4 मार्च) गट अ मधून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा पहिला सामना पार पडत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडत आहे. परंतु या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणे शक्य नाही. महत्त्वाचे म्हणजे या स्पर्धेत आतापर्यंत कोणत्याही संघाला 250 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. फक्त तीन वेळआ 250 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग झाला आहे. मात्र आता ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 264 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता भारतीय संघ या धावांचा पाठलाग करून अंतिम फेरीत धडक मारतो का? हे पाहावे लागेल. (India will be out of the tournament if they fail to chase down 265 against Australia)
नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी निर्णय घेतला. मात्र 4 धावांवर ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट पडली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक फलंदाजांनी अर्धशतकी भागिदारी करत संघाचा डाव सावरला. स्टीव्ह स्मिथने 96 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 73 धावा केल्या. तर त्याचवेळी अॅलेक्स कॅरीने 57 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 61 धावा केल्या. याशिवाय सलामीवीर फलंदाज ट्रेव्हिड हेडने 39 धावांचे योगदान दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 49.3 षटकात सर्वबाद 264 धावा केल्या. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, तर वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
हेही वाचा – IND vs AUS Semis : सामना बरोबरीत राहिल्यास सुपर ओव्हर होणार की नाही? ICC चा तो नियम चर्चेत
ऑस्ट्रेलियाने 250 हून अधिक धावा केल्यामुळे भारताचा विजय आता अवघड झाला आहे. कारण या मैदानावर आतापर्यंत फक्त 3 वेळा 250 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग शक्य झाला आहे. श्रीलंका संघाने 2013 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक 285 धावांचा पाठलाग केला आहे. यानंतर 2010 मध्ये पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 275 आणि नामिबियाने 2022 मध्ये ओमानविरुद्धच्या 266 धावांचा पाठलाग केला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 61 एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी 31 वेळा नाणेफेक हरणारा संघ विजयी झाला आहे. तर 36 वेळा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे आणि 23 वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे वरील दोन गोष्टी भारताच्या बाजूने गेल्यास संघ विजयी होऊ शकतो आणि अंतिम फेरीत धडक मारू शकतो. त्यामुळे आता भारतीय संघ कसे प्रदर्शन करतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.