नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेच्या साखळी फेरीतील अंतिम सामना आज अ गटातून भारत आणि न्यूझीलंड या संघात पार पडला. या दोन्ही संघाच्या कामगिरीवर आज स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट होणार होते. दोन्ही संघ आतापर्यंत या स्पर्धेत अपराजित राहिले होते. मात्र आज भारताने न्यूझीलंड संघाचा 44 धावांनी पराभव करत अ गटात अपराजित राहत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलिया संघाशी होणार आहे. (India will face Australia in the semi-finals of the Champions Trophy)
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले, परंतु भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा 15, शुभमन गिल फक्त 2 धावा करून बाद झाला. यानंतर 300 वा एकदिवसीय सामना खेळणारा विराट कोहली सुद्धा 11 धावा करून बाद झाला. अवघ्या 30 धावांवर भारताने आपल्या तीन विकेट गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी चौथ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले.
3/3 ✅ #TeamIndia will face Australia in the first Semi Final
Scoreboard ▶️ https://t.co/Ba4AY30p5i#NZvIND | #ChampionsTrophy pic.twitter.com/QxG9ZWeVMN
— BCCI (@BCCI) March 2, 2025
अक्षर पटेलने 61 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 42 धावा करून बाद झाला. यानंतर थोड्याच वेळात श्रेयस 98 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 79 धावा करून बाद झाला. हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर भारतीय डावाची पुन्हा घसरगुंडी झाली. हार्दिक पांड्याने 45 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 45 धावा केल्या. तर त्याचवेळी केएल राहुलने 23 आणि रवींद्र जडेजाने 16 धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारताने 50 षटकांत 9 विकेट गमावत 249 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 8 षटकांत 42 धावा देत 5 विकेट घेतल्या. तर काइल जेमिसन, विल्यम ओ’रोर्क, मिचेल सँटनर आणि रचिन रवींद्र यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 45.3 षटकांत 205 धावांवर सर्वबाद झाला. केन विल्यमसन वगळता न्यूझीलंडकडून एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करताना आली नाही. केन विल्यमसनने 120 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीने 81 धावा केल्या. त्यांच्याशिवाय कर्णधार मिचेल सँटनरने 28 धावा, टॉम लॅथमने 14, डॅरिल मिचेलने 17, विल यंगने 22 धावांचे योगदान दिले. काइल जेमिसन 9 धावा करून नाबाद राहिला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला पहिला सामना वरुण चक्रवर्तीने शानदार कामगिरी केली. त्याने 10 षटकात 42 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. वरुण व्यतिरिक्त कुलदीप यादवने 2, तर हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
हेही वाचा – Ranji Trophy Final : 2215 दिवसांनंतर रणजी ट्रॉफी पुन्हा विदर्भाकडे
उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियासोबत
न्यूझीलंडविरुद्धच्या या विजयासह भारताने अपराजित राहण्याची मालिका सुरूच ठेवत अ गटात अव्वल स्थान मिळवले आहे. त्यामुळे आता 4 मार्च रोजी दुबई येथे होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलिया संघासोबत होणार आहे. ऑस्ट्रेलियाने ग्रुप बी मध्ये 4 गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना 5 मार्च रोजी लाहोरमध्ये दक्षिण आफ्रिकेशी होईल. त्यामुळे आता 9 मार्च रोजी अंतिम फेरीत कोणते दोन संघ आमने-सामने येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.