कांगारुंच्या देशात, टीम इंडिया जोशात!

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ तुल्यबळ आणि त्यांच्यातील मालिका रंगतदार ठरतात हा अलीकडचा अनुभव, शिवाय ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाला आर्थिक चणचण भासत असताना भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आल्याने त्यांची गंगाजळी भरू शकते अशी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची धारणा आहे. विराट कोहली हा उत्कृष्ट फलंदाज तर आहेच, पण त्याचा मैदानातील वावर सगळ्यांना स्फूर्तीदायक ठरतो. विराट मायदेशी परतल्यावर उपकर्णधार रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात येईल असे वाटते. रहाणेने याआधीही भारतीय संघाचे यशस्वी नेतृत्व केले असून ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर त्याला आपली छाप पाडण्याची चांगली संधी आहे. 

team india
कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघ 

मागील वर्षी ७१ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात विजयी पताका फडकवणार्‍या विराट कोहलीच्या भारतीय संघाला यंदा (२०२०-२०२१ मध्ये) बॉर्डर-गावस्कर करंडक आपल्याकडे राखण्यासाठी पुष्कळ घाम गाळावा लागेल अशीच चिन्हे दिसत आहेत. डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ यांच्या पुनरागमनामुळे यजमान ऑस्ट्रेलियाची ताकद वाढली असून कोविडनंतर होणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या प्रदीर्घ दौर्‍यात भारतीय संघाची कसोटी लागेल. तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेगवेगळे खेळाडू असले तरी कर्णधार कोहली मात्र अ‍ॅडलेड डे-नाईट कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे (त्याची पालकत्व रजा बीसीसीआयने मंजूर केली). त्याच्या गैरहजेरीत बहुधा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला संघाचे नेतृत्व करावे लागेल, पण फलंदाज कोहलीची उणीव भारताला निश्चितच जाणवेल.

कोविडचे सावट ऑस्ट्रेलियातील मालिकेवर असून दक्षिण ऑस्ट्रेलियात (अ‍ॅडलेडमध्ये १७ डिसेंबरपासून डे-नाईट कसोटीने मालिकेला सुरुवात होतेय) कोविडची दुसरी लाट आल्यामुळे सरकारने सहा दिवसाचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठीच बाहेर जायला परवानगी दिली असून राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पहिली कसोटी अन्यत्र हलवण्याबाबतही विचारविनिमय सुरू आहे. यंदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे सामने वेळापत्रकानुसार खेळणे कठीण झाले आहे ते कोविडमुळे! इंग्लंडमध्ये विंडीज आणि पाकिस्तानविरुद्ध यजमान इंग्लंडने कसोटी मालिका खेळल्या, पण आयपीएलचा अपवाद वगळता जागतिक क्रिकेट ठप्पच होते.

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ तुल्यबळ आणि त्यांच्यातील मालिका रंगतदार ठरतात हा अलीकडचा अनुभव, शिवाय ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाला आर्थिक चणचण भासत असताना भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आल्याने त्यांची गंगाजळी भरू शकते अशी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची धारणा आहे. ऑस्ट्रेलियात स्वामी आर्मीची हजेरी यंदा कोविडमुळे मर्यादित असेल असे वाटते.

विराट कोहली हा उत्कृष्ट फलंदाज तर आहेच, पण त्याचा मैदानातील वावर सगळ्यांना स्फूर्तीदायक ठरतो. प्रतिस्पर्धी संघ, प्रेक्षक आणि संघ सहकारी देखील त्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असतात आणि त्याला उस्फूर्त दादही देतात. विराट मायदेशी परतल्यावर उपकर्णधार रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात येईल असे वाटते. रहाणेने याआधीही भारतीय संघाचे यशस्वी नेतृत्व केले असून ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर त्याला आपली छाप पाडण्याची चांगली संधी आहे. परदेशी त्याची फलंदाजी बहरते. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या त्रिकुटावर भारतीय फलंदाजीचा डोलारा असून विराटच्या गैरहजेरीत रोहित शर्मा भारतीय कसोटी चमूत दाखल होईल. लोकेश राहुल, मयांक अगरवाल या कर्नाटकी जोडीला सलामीला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. दोघांनी आयपीएलमध्ये खूप धावा केल्या आणि शतकी सलामीदेखील दिली.

पृथ्वी शॉदेखील कसोटी संघात आहे. त्याला सलामीला संधी मिळते का? याचे औत्सुक्य सार्‍यांनाच आहे. मात्र, आयपीएलमध्ये त्याची कामगिरी सुमारच होती. गेला ऑस्ट्रेलिया दौरा पृथ्वीसाठी विसरण्याजोगाच होता. दुखापतीमुळे कसोटी न खेळताच मायदेशी परतण्याची आफत त्याच्यावर ओढवली! सलामी भक्कम झाली तर भारताला चांगली धावसंख्या उभारण्याची उमेद बाळगता येईल.

स्टार्क, कमिन्स, हेझलवूड, पॅटिन्सन या ऑस्ट्रेलियाच्या तेज चौकडीने सुरुवातीलाच भारतीय डावाला खिंडार पाडल्यास पुजारा आणि रहाणे या जोडीला किल्ला लढवावा लागेल. गेल्या ऑस्ट्रेलियन दौर्‍यावर पुजाराने मालिकावीराचा किताब पटकावला. खेळपट्टीवर मुक्काम ठोकण्याचा चंगच त्याने बांधला होता. ५२१ धावा काढताना त्याने ३ शतकांसह एक अर्धशतकही केले होते. खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहण्यात त्याचा हातखंडा. त्याच्या साथीत युवा रिषभ पंतचा खेळही बहरला आणि त्यांनी मोठी द्विशतकी भागीदारी रचली.

कसोटी सामने जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला दोनदा गुंडाळणारे गोलंदाज संघात असावे लागतात. सामन्यात २० विकेट्स काढणारे, तसेच १४० च्या वेगाने गोलंदाजी करणारे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव असे तेज त्रिकुट लाभल्यामुळे अलीकडे भारतीय संघाची परदेशातील कामगिरी उठावदार दिसते. कर्णधार विराट कोहलीच्या यशस्वी कामगिरीचे गुपित यातच दडलेले आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर त्याला जायबंदी भुवनेश्वरकुमारची उणीव भासू नये, कारण दिल्लीकर नवदीप सैनी तसेच हैदराबादी सिराज यांची संघात वर्णी लागली आहे.

जलदगती, भेदक मारा करणारा तोफखाना पदरी बाळगाणार्‍या क्लाईव लॉईडच्या विंडीजने ७०-८० च्या दशकात क्रिकेट जगतावर राज्य केले. त्याचाच कित्ता गिरवीत स्टिव्ह वॉच्या ऑस्ट्रेलियाने ९० च्या दशकात अधिराज्य गाजवले. इम्रान खानच्या पाकिस्तानने सर्फराज नवाज, तसेच अब्दुल कादिर, इक्बाल कासीम या फिरकी जोडगोळीच्या जोरावर इंग्लंडला इंग्लंडमध्ये तर भारताला मायदेशात तसेच पाकिस्तानात हरवण्याची किमया साधली होती.

भारत, ऑस्ट्रेलिया हे जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप) स्पर्धेतील आघाडीचे संघ. ऑस्ट्रेलिया अव्वल, तर भारत दुसर्‍या क्रमांकावर. पूर्वी भारतीय संघ १०-२० वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा. अलीकडे मात्र दहा वर्षांत (२०११-१२ ते २०२०-२१) भारताने चार वेळा ऑस्ट्रेलिया दौरा केला आहे. यावरून या दोन संघातील लढतींची अटकळ बांधता येईल. धोनीच्या संघाला मायकल क्लार्कच्या संघाने खडे चारले, पण २०१८-१९ मध्ये विराट कोहलीच्या संघाने मालिका २-१ अशी जिंकली, शिवाय अखेरच्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. मात्र, ऑस्ट्रेलियाला पावसाने वाचवले. तब्बल ३२ वर्षांनी भारताने ऑस्ट्रेलियावर ऑस्ट्रेलियातील कसोटीत फॉलोऑन लादला. कपिल देवच्या संघाला सिडनी कसोटीत विजयाने हुलकावणी ती पावसामुळे.

लाला अमरनाथ, पतौडी, बेदी, गावस्कर, कपिल, तेंडुलकर, गांगुली, कुंबळे, धोनी या कर्णधारांच्या संघांना ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकता आली नाही हा इतिहास आहे. पॅकर सर्कशीत सामील झाल्यामुळे दुय्यम ऑस्ट्रेलियन संघाने बेदीच्या बलवान संघावर ३-२ असा विजय मिळवून १९७७-७८ ची मालिका खिशात टाकली. सुनील गावस्करच्या संघाला १९८०-८१ मध्ये १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. अझर, तेंडुलकर यांच्या संघांचे पानिपत झाले. गांगुली, कुंबळे यांच्या संघांनी ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिली खरी पण मालिका विजयाने त्यांनादेखील हुलकवणीच दिली. मंकीगेट प्रकरणाने २००८ चा दौरा गाजला. कुंबळेने नेटाने, शिताफीने हे प्रकरण हाताळले. धोनीला ऑस्ट्रेलियात लागोपाठ दोनदा कसोटी मालिकेत लाजिरवाण्या पराभवांना सामोरे जावे लागले आणि त्याने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

गावस्करला एक न्याय, तर कोहलीला वेगळाच!

भारताचा कर्णधार विराट कोहलीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पालकत्व रजा मंजूर केली आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात कोहली टी-२० आणि एकदिवसीय भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून अ‍ॅडलेडच्या पहिल्या (डे-नाईट) कसोटीनंतर कोहली मायदेशी परतेल. त्याची पत्नी अनुष्का शर्मा गरोदर असून बाळाच्या जन्मप्रसंगी उपस्थित राहण्याची इच्छा कोहलीने प्रकट केली. बीसीसीआयने त्याची रजा मंजूर केली. उर्वरित मालिकेसाठी कर्णधाराची निवड केली नसली तरी रहाणेला कर्णधारपदी बढती मिळेल असे वाटते.

सध्या बीसीसीआयचे धोरण बदलले असले तरी पूर्वी बोर्ड फार कर्मठ होते अन् याचा फटका बसला सुनील गावस्करला! १९७६ मध्ये भारतीय संघ न्यूझीलंड-वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर गेला होता. दौरा प्रदीर्घ होता, रोहन गावस्करचा जन्म झाला आणि सुनीलने बोर्डकडे भारतात परतण्यासाठी परवानगी मागितली. मात्र, त्याला परवानगी नाकारण्यात आली. सुनील दुखापतीमुळे खेळत नव्हता आणि उपचारासाठी तो न्यूयॉर्कला गेला होता. दरम्यान सामनाही नव्हता. त्यानंतर वेस्ट इंडिज दौरा सुरू झाला. अखेरीस सुनीलला रोहनचे दर्शन झाले ते अडीच महिन्यानंतर.

काळ बदलला, धोरण बदलले. अलिकडे सर्वच संघातील खेळाडूंना पालकत्व रजा देण्यात येते. ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज केन रिचर्ड्सनदेखील एकदिवसीय मालिकेत खेळणार नाही. त्याआधी इंग्लंडचा कर्णधार जो रूटनेही विंडीजविरुद्धच्या मालिकेत कसोटी सामना न खेळता रजा घेणे पसंत केले. याला अपवाद ठरला तो महेंद्रसिंग धोनी! २०१५ वर्ल्डकपआधी ऑस्ट्रेलिया दौरा करताना धोनीला कन्या रत्नाचा लाभ झाला. त्याला पत्नीने ही खुशखबर दिली ती सुरेश रैनामार्फत. धोनीने संघ हिताला प्राधान्य देत राष्ट्रीय कर्तव्य बजवाले.

शेन वॉर्न, क्रिस हॅरीस प्रभूतींनी पण पालकत्व रजेचा उपयोग करून खेळाला तात्पुरती विश्रांती देण पसंत केले. ऑस्ट्रेलियाचा प्रदीर्घ दौरा जवळपास दोन महिने चालेल. बायो-बबलमध्ये खेळाडूंना राहावे लागेल तीच त्यांची सत्वपरीक्षा ठरणार आहे. एकदिवसीय तसेच टी-२० मध्ये भारतीय संघ यजमान ऑस्ट्रेलियाला तोडीस तोड लढत देऊ शकेल. आयपीएलमध्ये सगळे भारतीय खेळाडू दोन महिने खेळत होते, अपवाद पुजारा आणि हनुमा विहारी यांचा. ते दोघे कसोटी संघात असून सध्या सिडनीत सरावात मग्न आहेत.

कसोटी मालिकेला सुरुवात होईल डे-नाईट कसोटीने. डे-नाईट कसोटीत ऑस्ट्रेलियाचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. निर्भेळ यश त्यांनी मिळवले आहे. भारतीय खेळाडूंना अवघ्या एकाच डे-नाईट कसोटीचा अनुभव आहे, तोदेखील बांगलादेशसारख्या तळाच्या संघाशी! त्यानंतर विराटविना खेळताना तेज खेळपट्ट्यांवर रहाणे, पुजारा यांना इतरांची साथ लाभणे गरजेचे आहे. बुमराह, शमी, उमेश यादव हे तेज त्रिकुट चांगला धारदार मारा करतील अशी उमेद नक्की बाळगता येईल; त्यावरच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा निकाल लागेल!