घरक्रीडाराहुल, पंतच्या कामगिरीकडे लक्ष!

राहुल, पंतच्या कामगिरीकडे लक्ष!

Subscribe

भारत-विंडीज पहिला टी-२० सामना आज

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होणार असून या मालिकेत लोकेश राहुल आणि युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. भारत-विंडीज पहिला टी-२० सामना हैदराबाद येथे होणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होणार्‍या टी-२० विश्वचषकाला आता काहीच महिने शिल्लक असल्याने प्रत्येक सामन्याचे महत्त्व वाढले आहे. या विश्वचषकासाठी भारताच्या संघात कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर यांसारख्या खेळाडूंना स्थान मिळणार हे जवळपास निश्चितच आहे. मात्र, इतर जागांसाठी बरीच स्पर्धा आहे. राहुल आणि खासकरून पंतला मागील काही सामन्यांत विशेष कामगिरी करता आलेली नाही. परंतु, विंडीजविरुद्ध चांगला खेळ करत ते संघातील स्थान पक्के करू शकतील.

डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे या टी-२० मालिकेत खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत राहुलला रोहित शर्मासोबत सलामीला खेळण्याची संधी मिळू शकेल. राहुलने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट आतापर्यंत ३१ सामन्यांत ४२.३४ च्या सरासरीने ९७४ धावा केल्या आहेत, ज्यात २ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच तो आयपीएलच्या प्रत्येक मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी करतो. मात्र, असे असतानाही त्याला अजून संघात आपले स्थान पक्के करता आलेले नाही. राहुलप्रमाणेच युवा पंतलाही आपल्या टीकाकारांची तोंडे बंद करायला आवडेल. पंतला मागील काही काळात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत फारशा धावा करता आलेल्या नाहीत. त्यातच तो यष्टींमागेही बर्‍याच चुका करत आहे.

- Advertisement -

पंतकडे महेंद्रसिंग धोनीनंतरचा महान यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून पाहिले जात होते. मात्र, इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकापासून त्याचा फॉर्म खालावला आहे आणि तो बर्‍याचदा खराब फटका मारून बाद झाला आहे. निवड समितीने बांगलादेशविरुद्धच्या मागील टी-२० मालिकेप्रमाणेच या मालिकेसाठीही संजू सॅमसनची राखीव यष्टीरक्षक म्हणून निवड केली आहे. त्यामुळे पंतच्या कामगिरीत सुधारणा न झाल्यास त्याचे संघातील स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे.

भारताने नुकतीच झालेली बांगलादेशविरुद्धची तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली होती. त्या मालिकेसाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती, पण विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच रोहितलाही विश्रांती मिळालेली नाही. त्यामुळे या मालिकेत भारताचे पारडे जड मानले जात आहे. गोलंदाजीत चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव, तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारचे टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे कुलदीप आणि युजवेंद्र चहल ही ’कुलचा’ म्हणून ओळखली जाणारी भारताची फिरकी जोडगोळी बर्‍याच सामन्यांनंतर एकत्र खेळताना दिसू शकेल. या गोलंदाजांना दीपक चहर आणि अष्टपैलू शिवम दुबेची साथ लाभेल.

- Advertisement -

दुसरीकडे वेस्ट इंडिज टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम संघांपैकी एक म्हणून ओळखला जातो. मात्र, त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. याचवर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या टी-२० मालिकेत भारताने विंडीजला त्यांच्याच मैदानावर ३-० अशी धूळ चारली होती. आता भारतात होणार्‍या मालिकेत मात्र अनुभवी किरॉन पोलार्ड या संघाचे नेतृत्व करणार आहे. या सामन्यात निकोलस पूरन खेळू शकणार नाही. त्यामुळे फलंदाजीची धुरा पोलार्डसोबतच युवा शिमरॉन हेटमायरवर आहे. या संघात आंद्रे रसेल आणि कार्लोस ब्रेथवेटसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश नसला तरी भारताला मालिका जिंकण्यासाठी सर्वोत्तम खेळच करावा लागेल.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, संजू सॅमसन.

विंडीज : किरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबिअन अ‍ॅलन, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, किमो पॉल, ब्रँडन किंग, एविन लुईस, खेरी पिएर, निकोलस पूरन, दिनेश रामदीन, शर्फेन रुदरफोर्ड, लेंडल सिमन्स, केसरिक विल्यम्स, हेडन वॉल्श ज्युनिअर.

सामन्याची वेळ – रात्री ७ पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -