घरक्रीडालक्ष्य मालिका विजयाचे!

लक्ष्य मालिका विजयाचे!

Subscribe

भारत-विंडीज दुसरा कसोटी सामना आजपासून

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. भारताने अँटिग्वा येथे झालेला पहिला कसोटी सामना जिंकत या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. तसेच या विजयामुळे भारताने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ६० गुणांची कमाई केली. आता दुसरा सामना जिंकत आणखी ६० गुण मिळवण्याचे आणि मालिका जिंकण्याचे विराट कोहलीच्या भारतीय संघाचे लक्ष्य असेल. भारताने याआधी झालेली टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतही विंडीजला व्हाईटवॉश दिला होता.

विंडीजला पहिल्या कसोटीत चांगला खेळ करण्यात अपयश आले. त्यांचे वेगवान गोलंदाज किमार रोच आणि शॅनन गेब्रियल यांनी झुंज दिली. परंतु, त्यांच्या फलंदाजांची कामगिरी अतिशय निराशाजनक होती. दोन्ही डावांमध्ये त्यांच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. पहिल्या दिवशी पावसामुळे बराच वेळ वाया गेल्यानंतरही हा सामना अवघ्या ४ दिवसांत संपला. विंडीजच्या फलंदाजांना जसप्रीत बुमराह (६ विकेट्स), ईशांत शर्मा (८ विकेट्स) आणि मोहम्मद शमी (४ विकेट्स) या भारताच्या तेज त्रिकुटाने बरेच अडचणीत टाकले. मात्र, २ सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना गमावल्यामुळे किंग्स्टन, जमैका येथे होणारा दुसरा सामना जिंकणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे मालिका बरोबरीत संपवण्यासाठी विंडीजच्या फलंदाजांनी त्यांच्या खेळात सुधारणा करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

दुसरीकडे उपकर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्या कसोटी सामन्यात ८१ आणि १०२ धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. हे त्याचे दोन वर्षांनंतर कसोटीतील पहिले शतक होते. त्याला पहिल्या दोन्ही डावांमध्ये हनुमा विहारीने उत्तम साथ दिली. दुसर्‍या डावात त्याचे शतक अवघ्या ७ धावांनी हुकले. त्यामुळे दुसर्‍या सामन्यातही रोहित शर्माला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. सलामीवीर लोकेश राहुल (४४ व ३८) आणि कर्णधार विराट कोहली (९ व ५१) यांनीही पहिल्या सामन्यात समाधानकारक प्रदर्शन केले. मात्र, युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत चांगला खेळ करता आला आहे. पंतने टी-२० मालिकेच्या एका सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती.

मात्र, या व्यतिरिक्त त्याला या दौर्‍यातील ६ डावांमध्ये ३० धावांचा टप्पाही पार करता आलेला नाही. तो संपूर्ण दौर्‍यातच वारंवार खराब फटका मारून बाद झाला आहे. त्यातच अनुभवी वृद्धिमान साहाचे भारतीय संघात पुनरागमन झाल्याने पंतवर सातत्याने धावा करण्याचा दबाव आहे. सलामीवीर मयांक अगरवालचाही दुसर्‍या सामन्यात मोठी खेळी करण्याचा प्रयत्न असेल. अष्टपैलू रविंद्र जाडेजाने फलंदाजीत आपली चमक दाखवली. परंतु, गोलंदाजीत त्याला दोनच विकेट मिळाल्या. मात्र, असे असले तरी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची संघात निवड होण्याची शक्यता कमीच आहे.

- Advertisement -

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अगरवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, उमेश यादव.

वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, जॉन कॅम्पबेल, शाई होप (यष्टीरक्षक), डॅरेन ब्राव्हो, रॉस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जहमार हॅमिल्टन (यष्टीरक्षक), रहकीम कॉर्नवेल, शॅनन गॅब्रियल, किमार रोच, किमो पॉल, शमार ब्रूक्स.

सामन्याची वेळ : रात्री ७ पासून
थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, सोनी टेन ३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -