Homeक्रीडाU-19 Womens World Cup : भारतीय पोरींची कमाल, दुसऱ्यांदा कोरले विश्वचषकावर नाव

U-19 Womens World Cup : भारतीय पोरींची कमाल, दुसऱ्यांदा कोरले विश्वचषकावर नाव

Subscribe

मलेशियामध्ये खेळवल्या जात असलेल्या 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना आज (2 फेब्रुवारी) क्वालालंपूरच्या बायू मास ओव्हल मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा 9 विकेट्सने पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले आहे.

नवी दिल्ली : मलेशियामध्ये खेळवल्या जात असलेल्या 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना आज (2 फेब्रुवारी) क्वालालंपूरच्या बायू मास ओव्हल मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा 9 विकेट्सने पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले आहे. महत्त्वाचे म्हणजे आयसीसी 19 वर्षाखालील महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेला 2023 साली सुरुवात झाल्यानंतर भारतीय संघ विजेता बनला होता. (India wins the Under-19 Women T20 World Cup for the second time)

19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय कुठेतरी चुकलेला दिसला. कारण संघाची सुरुवातच खराब झाली. दुसऱ्या षटकात सिमोन लॉरेन्सच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिला धक्का बसला. सिमोनला खाते उघडता आले नाही. भारताच्या परुनिका सिसोदियाने सिमोनला क्लीन बोल्ड केले. यानंतर चौथ्या षटकात शबनम शकीलने सलामीवीर जेम्मा बोथाला बाद करत दक्षिण आफ्रिका संघाला दुसरा धक्का दिला. जेम्माने 14 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 16 धावा केल्या. पाचव्या षटकात डायरा रामलकनच्या रुपात संघाला तिसरा धक्का बसला. डायरा 3 धावा करून बाद झाल्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाची अवस्था 3 बाद 20 अशी पोहचली होती.

कर्णधार कायला रेनेके आणि कराबो मेसो यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न करत चौथ्या विकेटसाठी 20 धावांची भागीदारी केली. मात्र गोंगाडी त्रिशाने रेनेकेला बाद करत दक्षिण आफ्रिका संघाला चौथा धक्का दिला. रेनेके 21 चेंडूत फक्त 7 धावाच काढू शकली. रेनेके बाद झाल्यानंतर आयुषी शुक्लाने मेसोला 10 धावांवर बाद केले. यानंतर गोंगाडी त्रिशाने मिके व्हॅन वुर्स्ट आणि सेशनी नायडू यांना लागोपाठ बाद केले. त्रिशा 18 चेंडूत 23 धावा करून बाद झाली तर सेशनीला आपले खातेही उघडता आले नाही. यानंतर वैष्णवी शर्माने फे काउलिंग (15) आणि मोनालिसा लेगोडी (0) यांना माघारी पाठवले. पारुनिका सिसोदिया डावाच्या शेवटच्या चेंडूवर अ‍ॅशले व्हॅन विकला बाद केले. तिलाही आपले खाते उघडता आले नाही. भारताकडून गोंगाडी त्रिशाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर पारुनिका सिसोदिया, आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा यांना प्रत्येकी दोन विकेट आणि शबनम शकीलला एक विकेट मिळाली.

अकरा षटकात भारताने जिंकला सामना

दरम्यान, अष्टपैलू फलंदाज गोंगाडी त्रिशा आणि जी. कमलिनी यांनी भारताला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 30 चेंडूत 36 धावा जोडल्या. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार रेनेकेने कमलिनीला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. कमलिनी फक्त 8 धावा करू शकली. यानंतर, गोंगाडीने सानिका चालकेसह 48 धावांची भागिदारी करत भारताला 9 विकेट्सने शानदार विजय मिळवून दिला. गोंगाडीने 33 चेंडूत 8 चौकारांसह 44, तर सानिकाने 22 चेंडूत 4 चौकारांसह 26 धावा काढल्या. त्यामुळे भारताने 11.2 षटकात दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेल्या लक्ष्याचा सहज पाठलाग केला. यासह भारताने सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले.