थायलंडला धूळ चारत भारत उपांत्य फेरीत!

जकार्ता-पालेमबांग येथे सुरू असलेल्या १८ व्या एशियन गेम्स महिला हॉकी स्पर्धेच्या साखळी सामन्यात भारताच्या संघाने थायलंडचा ५-० असा पराभव केला. या विजयात सर्वात महत्वाची भूमिका बजावली ती भारताची कर्णधार राणी रामपालने. भारताच्या पाचपैकी ३ गोल राणीने केले.

भारतीय हॉकी
जकार्ता-पालेमबांग येथे सुरू असलेल्या १८ व्या एशियन गेम्स महिला हॉकी स्पर्धेच्या साखळी सामन्यात भारताच्या संघाने थायलंडचा ५-० असा पराभव केला.

कर्णधार राणी रामपालची हॅट्रिक 

साखळी सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने थायलंडचा ५-० असा पराभव केला. या विजयात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती भारताची कर्णधार राणी रामपालने. भारताच्या पाचपैकी ३ गोल राणीने केले. या सामन्याच्या मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांत ०-० अशी बरोबरी होती. मध्यंतरानंतर तिसऱ्या सत्राच्या १० व्या मिनिटाला कर्णधार राणी रामपालने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. यानंतर चौथ्या सत्राच्या सुरुवातीला राणीने पुन्हा एक गोल करत भारताची आघाडी २-० केली. तर पेनल्टी कॉर्नरवर मोनिकाने गोल करत भारताची आघाडी आणखी वाढवली. पुढचाही गोल भारतानेच केला. भारतासाठी नवज्योत कौरने हा गोल केला. सामना संपण्यापूर्वी राणीने पुन्हा एक गोल करत आपली हॅट्रिक पूर्ण केली.

कसा होता साखळी फेरीतील प्रवास 

भारतीय महिला संघाने या स्पर्धेत उत्तम प्रदर्शन केले आहे. पूल ‘बी’ मध्ये असलेल्या भारताने पहिल्या साखळी सामन्यात इंडोनेशियाचा ८-० असा पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय महिलांनी कझाकिस्तानचा २१-० असा धुव्वा उडवला होता. तिसऱ्या सामन्यात भारताने द.कोरियाला ४-१ असे पराभूत केले होते. आज झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताने थायलंडला ५-० असे नमवले. त्यामुळे या स्पर्धेत एकही सामना न गमावता भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

उपांत्य फेरीत चीन किंवा जपानशी सामना  

या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला असून, या फेरीत भारताचा सामना चीन किंवा जपानशी होणार आहे.