घरक्रीडामानधनाची पुन्हा चमक, भारत पुन्हा विजयी

मानधनाची पुन्हा चमक, भारत पुन्हा विजयी

Subscribe

अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीच्या ३ विकेट आणि स्मृती मानधनाच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने न्यूझीलंड महिला संघावर दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे भारताने ३ सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी अजय आघाडी मिळवली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध २०१४-२०१६ या काळात आयसीसी महिला चॅम्पियनशिप मालिकेत झालेल्या पराभवाची भारताने परतफेड केली आहे.

सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडला अवघ्या १६१ धावांत गुंडाळत भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. न्यूझीलंडने सुरुवातीपासूनच खराब खेळ केला. त्यांचा निम्मा संघ ६२ धावांतच माघारी परतला होता. मात्र, कर्णधार एमी सॅटरवेट (७१) आणि लिह कॅस्परेक (२१) यांनी चांगली फलंदाजी करत न्यूझीलंडची धावसंख्या १६१ पर्यंत नेली. भारताकडून झुलनने ३ तर एकता बिश्त, दीप्ती शर्मा आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

- Advertisement -

१६२ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. जेमिमा रॉड्रिग्स (०) आणि दीप्ती शर्मा (८) लवकर बाद झाल्याने भारताची २ बाद १५ अशी धावसंख्या होती. मात्र, यानंतर पहिल्या सामन्यात शतक करणार्‍या स्मृती मानधना आणि मिताली राज यांनी चांगली फलंदाजी केली. मानधनाने आक्रमक तर मितालीने सावधपणे फलंदाजी केली. मानधनाने अवघ्या ५४ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण झाल्यावर मानधनाने अधिकच आक्रमक फलंदाजी केली. दरम्यान, मितालीने १०२ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघींनी पुढेही चांगली फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. स्मृतीने ८३ चेंडूंत १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ९० तर मितालीने १११ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ६३ धावा केल्या. या दोघींनी तिसर्‍या विकेटसाठी १५१ धावांची अभेद्य भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक –

- Advertisement -

न्यूझीलंड : ४४.२ षटकांत सर्वबाद १६१ (सॅटरवेट ७१, कॅस्परेक २१; झुलन गोस्वामी ३/२३, एकता बिश्त २/१४, पूनम यादव २/३८, दीप्ती शर्मा २/५१) पराभूत वि. भारत ३५.२ षटकांत २ बाद १६६ (मानधना ९०*, मिताली ६३*; लिया ताहूहू १/१६, अ‍ॅना पीटरसन १/२६).

गोलंदाजांची कामगिरी कौतुकास्पद – मानधना

स्मृती मानधना मागील काही काळात अप्रतिम फॉर्मात आहे. तिने मागील १० एकदिवसीय सामन्यांत ८ अर्धशतके केली आहेत. तिलाच न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या सामन्यात सामनाविराचा पुरस्कार मिळाला. सामनाविराचा पुरस्कार मिळाल्याचा मला आनंद आहे. पण, जर हा पुरस्कार गोलंदाजाला मिळाला असता तर मला जास्त आनंद झाला असता, असे मानधना म्हणाली. या सामन्याची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल होती. असे असतानाही आमच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला इतक्या कमी धावांत रोखणे हे खूपच कौतुकास्पद होते, असे मानधना म्हणाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -