Homeक्रीडाIND VS ENG : चांगल्या सुरुवातीनंतर इंग्लंड फलंदाजांची निराशा, भारताने मालिका जिंकली

IND VS ENG : चांगल्या सुरुवातीनंतर इंग्लंड फलंदाजांची निराशा, भारताने मालिका जिंकली

Subscribe

अष्टपैलू फलंदाज हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने चौथ्या सामन्यात 181 धावा केल्या. मात्र प्रत्युत्तरात चांगल्या सुरुवातीनंतरही इंग्लंड फलंदाजांचा भारतीय गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. भारतीय संघाने चौथ्या सामन्यात विजय मिळवत टी-20 मालिकेत 3-1 ने आघाडी घेत मालिका जिंकली.

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज (31 जानेवारी) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात अष्टपैलू फलंदाज हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने चांगली सुरुवात केली. मात्र भारतीय गोलंदाजांच्या आक्रमणापुढे इंग्लंड फलंदाजांचा निभाव लागला नाही. भारतीय संघाने चौथ्या सामन्यात विजय मिळवत टी-20 मालिकेत 3-1 ने आघाडी घेत मालिका जिंकली. (India won the T20 series by defeating England in the fourth match)

इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र चौथ्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळालेल्या भारताची सुरुवात खराब झाली. अवघ्या 12 धावांवर भारताने 3 विकेट गमावल्या होत्या. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज साकिब महमूदने संजू सॅमसन (1), तिलक वर्मा (0) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (0) यांना बाद केले. यानंतर रिंकू सिंग आणि अभिषेक शर्मा यांनी संघाचा पदभार स्वीकारला. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 32 चेंडूत 45 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे भारताची धावसंख्या 3 बाद 50 च्या पुढे गेली. मात्र डावातील आठवे षटक टाकण्यासाठी आलेल्या आदिल रशीदने सलामीवीर अभिषेकला जेकब बेथेलने झेलबाद केले. अभिषेक शर्मा 29 धावा करून बाद झाला, तर रिंकू सिंगने 26 चेंडूत 30 धावांची खेळी केली.

हेही वाचा – Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरला जीवनगौरव पुरस्कार मिळणार, बीसीसीआय कधी करणार सन्मान?

79 धावांवर भारताच्या पाच विकेट पडल्यानंतर अष्टपैलू शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी भारताचे लक्ष्य 160 धावांच्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. हार्दिक पांड्याने 27 चेंडूत आपले टी-20 कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक 27 चेंडूत पूर्ण केले, तर तिकल वर्माने त्याचे टी-20 कारकिर्दीतील चौथे अर्धशतक 31 चेंडूत पूर्ण केले. दोघांनी प्रत्येकी 53 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय अक्षर पटेलने पाच धावांचे योगदान दिले. यासह भारताने 9 विकेट गमावत 181 धावा केल्या. इंग्लंडकडून साकिब महमूदने 3, जेमी ओव्हरटनने 2 आणि ब्रायडन कार्स व आदिल रशीदने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

हेही वाचा – Virat Kohli : 12 वर्षांनी आला अन् 6 वर बाद झाला, पहिल्या रणजी सामन्यात कोहलीची कामगिरी

भारताने जिंकली टी-20 मालिका

दरम्यान, भारताकडून मिळालेल्या 182 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने चांगली सुरुवात केली. सलामीवीर फिल सॉल्ट आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 36 चेंडूत 62 धावांची खेळी केली. बेन डकेटच्या (39) रुपात इंग्लंडला पहिला धक्का बसला. यानंतर फिल सॉल्टही 23 धावा करून बाद झाला. 65 धावांवर दोन विकेट पडल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंड संघावर दबाव बनवण्यास सुरुवात केली. हॅरी ब्रूकची 26 चेंडूत 51 धावांची खेळी वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडला सर्वबाद 166 धावाच करता आल्या. भारताकडून चौथ्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या वेगवान गोलंदाज हर्षित राणाने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत 33 धावा 3 विकेट घेतल्या. तर फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईलाही 3 विकेट मिळवण्यात यश आले. याशिवाय वरुण चक्रवर्तीने 2, अर्शदीप आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली. यासह भारताने 15 धावांनी सामना जिंकत टी-20 मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे.